एकट्या पुणे जिल्ह्यात चीनची तब्बल ४ हजार ९३६ कोटींची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 16:09 IST2020-06-24T16:08:03+5:302020-06-24T16:09:58+5:30
सध्या भारत चीन वाद चिघळला असून दोन्ही देशात तणावपूर्ण संबंध आहे...

एकट्या पुणे जिल्ह्यात चीनची तब्बल ४ हजार ९३६ कोटींची गुंतवणूक
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : सध्याच्या चीन-भारत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी वस्तंूवर बहिष्कार टाकणे, चिनी उत्पादनांना विरोध आदी प्रकार जनतेतून उत्स्फूर्तपणे सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील चिनी कंपन्यांची गुंतवणूक किती, हे पाहिले असता रोचक माहिती समोर आली आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात चीनची ४ हजार ९३६ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपासून या कंपन्या पुणे जिल्ह्यात कार्यरत असून, या कंपन्यांमध्ये सुमारे ५ हजार ४०४ लोकांना रोजगार मिळाला आहे.
राज्य शासनाने दोन आठवड्यांपूर्वी चीनच्या हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो, मोबिलिटी सोल्युशन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चिनी कंपन्यांसोबत नव्याने पाच हजार कोटींचे करार केले आहेत. या सर्व सामंजस्य करारांना शासनाने तुर्तास स्थगिती दिली आहे.
मात्र, लेझो बिल्डटेक, फोटॉन मोटर्स, जुशी, किंगफा सायन्स टेक्नॉलॉजी लि., हायर अॅप्लिकन्सेस इंडिया प्रा.लि., सॅनी हेवी इंडस्ट्री इंडिया या सहा चिनी कंपन्यांचे प्रकल्प चाकण आणि रांजणगावच्या एमआयडीसीत चालू आहेत. नव्या गुंतवणुकीला स्थगिती देणारे शासन या चिनी गुंतवणुकीबाबत काय निर्णय घेणार, असा प्रश्न आहे.
चौकट
पुण्यातली चिनी गुंतवणूक
कंपनी एमआयडीसी क्षेत्र गुंतवणूक (कोटींत)
लेझो बिल्डटेक चाकण टप्पा-२ ३१०
फोटॉन मोटर्स चाकण टप्पा-२ १६७६
जुशी तळेगाव टप्पा-२ १५६०
किंगफा चाकण टप्पा-२ १२००
हायर रांजणगाव १९०
सॅनी हेवी चाकणटप्पा-२ ६९