कमी वेळेत परतावा मिळवायला गेले, तिघांनी ४२ लाख गमावले; फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 10:29 AM2024-04-10T10:29:56+5:302024-04-10T10:30:14+5:30

याप्रकरणी शहरातील सहकारनगर, सिंहगड रस्ता, कोंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

42 lakhs were lost by the trio, who went on to earn returns in a short period of time; Increase in cases of fraud | कमी वेळेत परतावा मिळवायला गेले, तिघांनी ४२ लाख गमावले; फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

कमी वेळेत परतावा मिळवायला गेले, तिघांनी ४२ लाख गमावले; फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

पुणे : कमी वेळेत चांगला परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडत सायबर चोरट्यांकडून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. सायबर चोरट्यांनी तिघांची एकूण मिळून ४२ लाख २४ हजार ८९९ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शहरातील सहकारनगर, सिंहगड रस्ता, कोंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परताव्याच्या आमिषाने धनकवडी येथील एका महिलेची ११ लाख ५१ हजार १५० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ३ नोव्हेंबर २०२३ ते २० जानेवारी २०२४ दरम्यानच्या काळात घडली आहे.

सायबर चोरट्याने फिर्यादी यांना संपर्क करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यात ११ लाख ५५ हजार ९०० रुपये भरायला भाग पाडले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना ४ हजार ७५० रुपये परत पाठवले. मात्र उर्वरित ११ लाख ५१ हजार १५० रुपये न पाठवता सायबर चोरट्याने फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक माळाळे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत नऱ्हे भागात राहणाऱ्या एका महिलेची शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने १८ लाख ९५ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय महिलेने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १४ फेब्रुवारी ते ५ एप्रिल २०२४ दरम्यानच्या काळात घडली आहे. शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळतो असे सांगून फिर्यादी महिलेला व्हाॅटसॲप ग्रुप मध्ये अँड करण्यात आले. यानंतर फिर्यादी यांना १८ लाख ९५ हजार विविध बँक खात्यात भरायला भाग पाडून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

तिसऱ्या घटनेत कोंढवा भागातील एकाची टास्कच्या बहाण्याने ११ लाख ७८ हजार ७४९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रोमू आरपी सेन यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २९ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२४ दरम्यानच्या काळात ही घटना घडली आहे. सायबर चोरट्याने फिर्यादी यांना टेलिग्रामवरून संपर्क करून टास्कच्या बहाण्याने गुंतवणूक करायला भाग पाडून ११ लाख ७८ हजार ७४९ रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.

Web Title: 42 lakhs were lost by the trio, who went on to earn returns in a short period of time; Increase in cases of fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.