आय फोनसाठी महिलेला घातला ४ कोटींना गंडा, आरोपीवर खंडणीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:17 PM2021-04-22T12:17:19+5:302021-04-22T12:19:20+5:30

सायबर चोरट्यांनी फसवणुकीबरोबर धमकावून लुबाडले

4 crore bribed for iPhone, accused charged with ransom | आय फोनसाठी महिलेला घातला ४ कोटींना गंडा, आरोपीवर खंडणीचा गुन्हा दाखल

आय फोनसाठी महिलेला घातला ४ कोटींना गंडा, आरोपीवर खंडणीचा गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देवेगवेगळी कारणे सांगून मागत होता पैसे, महिलेची शेवटी पोलिसांकडे धाव

पुणे: एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर असलेल्या एका महिलेला सायबर चोरट्याने भुरळ पाडून चक्क ४ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आहे. ६० वर्षाच्या या महिलेची सुरुवातीला फसवणूक करुन काही रक्कम उकळली. त्यानंतर तिला धमकाविण्यास सुरुवात करुन वेगवेगळ्या प्रकारे भिती दाखवून तिच्याकडून ३ कोटी ९८ लाख ७५ हजार ५०० रुपये लुबाडण्यात आले आहेत. सायबर पोलिसांनी फसवणुकीबरोबरच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. शेवटी ६० वर्षाच्या या महिलेने सायबर पोलिसांकडे धाव घेऊन फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही महिला एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करत आहेत. तिला गेल्या वर्षी फेसबुक अकाऊंटवर फ्रेंड रिकवेस्ट आली. त्यातून त्यांच्यात फेसबुकवरुन ओळख वाढली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वाढदिवसानिमित्त आरोपीने या महिलेला आयफोन कंपनीचा मोबाईल गिफ्ट म्हणून पाठविला असल्याचे सांगितले.

त्यानंतर त्यांनी दिल्ली येथील कस्टम ऑफिसमध्ये मोबाईल पार्सल आले असून पार्सल सोडविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी किरकोळ रक्कम मागितली. ती या महिलेने दिली. या महिलेची सर्व माहिती सायबर चोरट्यांकडे असल्याने त्यांनी या महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. तुमच्या मालमत्तेची माहिती आयकर विभागाला कळवू, ते तुमच्यावर धाड टाकतील, तुमची बदनामी होईल, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, असे सांगून सायबर चोरट्यांनी त्यांना भिती दाखविण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या या महिलेने ते सांगतील, त्याप्रमाणे त्यांना पैसे देण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे चोरट्यांनी २५ बँकेच्या ६७ बँक खात्यांवर तब्बल ३ कोटी ९८ लाख ७५ हजार ५०० रुपये पाठविण्यास भाग पाडले. तरीही त्यांच्याकडून धमकावले जात असल्याने शेवटी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: 4 crore bribed for iPhone, accused charged with ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.