लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ठाकूरसाई गावात मंगळवारी (१५ जुलै) दुपारी ३३ वर्षीय महिलेसोबत निर्घृण लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात बाळू दत्तू शिर्के (वय अंदाजे ३५, रा. जीवन, ता. मावळ) याला पोलिसांनीअटक केली असून, त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेला निर्जनस्थळी ओढून नेऊन अत्याचार
पीडित महिला मंगळवारी दुपारी माहेरी जाण्यासाठी निघाली असताना आरोपी बाळू शिर्के याने दुचाकीवरून तिचा पाठलाग सुरू केला. रस्त्यावर कोणीही नसल्याचे पाहून त्याने महिलेला जबरदस्तीने ओढून एका निर्जन जागी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर पीडितेला त्याच अवस्थेत सोडून आरोपीने तेथून पळ काढला.
पोलिसांचा अचूक तपास
पीडितेने धैर्याने पुढे येत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या घटनेनंतर पोलिसांनी कोणताही ठोस पुरावा नसताना शिताफीने तपासाला सुरुवात केली. घटनास्थळापासून बऱ्याच लांब असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पीडितेचा पाठलाग करताना दिसून आला. विशेष म्हणजे आरोपीने घातलेल्या जॅकेटमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.
सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये शोधमोहीम राबवली आणि अखेर आरोपी बाळू शिर्के याला अटक करण्यात यश मिळवले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौतुकास्पद मार्गदर्शन
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि त्यांच्या पथकाने तपासाची सूत्रे संभाळत ही कारवाई केली.
पुढील तपास सुरू
आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी करत पुरावे गोळा करण्याचे काम सुरू ठेवले आहे.