पोलिसांमुळे ३२ मुले गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 01:56 IST2019-03-22T01:55:34+5:302019-03-22T01:56:02+5:30
मित्राने आणलेली मोटारसायकल पाहून तो त्याच्याबरोबर मागे बसला व ते फिरत असताना त्यांना पोलिसांनी पकडले. मित्राबरोबर त्याच्यावरही वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला.

पोलिसांमुळे ३२ मुले गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर
- विवेक भुसे
पुणे - मित्राने आणलेली मोटारसायकल पाहून तो त्याच्याबरोबर मागे बसला व ते फिरत असताना त्यांना पोलिसांनी पकडले. मित्राबरोबर त्याच्यावरही वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे घरातील तसेच आजूबाजूचे लोकही त्याच्याकडे वाईट नजरेने पाहू लागले़ कोणताही सहभाग नसताना त्याच्यावर चोरीचा शिक्का बसला. प्रचंड नैराश्य आलेल्या या मुलाला पोलिसांनी मार्गदर्शन व मदत केल्याने तो आता या सर्व परिस्थितीतून बाहेर आला आहे़ आता तो बारावीत आहे.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीमध्ये बालगुन्हेगारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे़ एकदा त्यांच्यावर एखादा गुन्हा दाखल झाला की त्याच्याकडे आजूबाजूचे लोक गुन्हेगार, चोर म्हणून पाहतात़ मित्रांकडून हेटाळणी होते़ त्यामुळे तो इतरांपासून तुटत जाऊन आपोआप गुन्हेगारीकडे ओढला जातो़ त्यातून कायमचा गुन्हेगार होतो.
पुणे शहरात गेल्या तीन वर्षांत तब्बल दीड हजार अल्पवयीन मुले बालगुन्हेगार किंवा विधीसंघर्षित ठरले आहे़ ही मुले कायमस्वरूपी गुन्हेगारीत ओढली जाऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष बालपथकाची स्थापना केली आहे़ या माध्यमातून मुलांचे तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले जाते़ त्यांना यातून दूर करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाऊ लागली आहे.
पुणे पोलिसांनी ३२ मुलांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारीपासून दूर केले आहे़ अल्पवयीन मुलांकडून अनेकदा हौस म्हणून वाहनचोरी करून ती फिरविली जाते़ त्यात ते पकडले गेले की, त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसतो़ अनेकदा काही जण त्यांचा वापर करून घेत असतात़
याबाबत विशेष बालपथकाचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब भोर यांनी सांगितले की, भरोसा सेल अंतर्गत विशेष बालपथकाची स्थापना करण्यात आली आहे़
विधीसंघर्षग्रस्त मुलांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारीपासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ त्यासाठी या क्षेत्रात काम
करणारे कार्यकर्ते तसेच १९ सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येत आहे. विधीसंघर्षग्रस्त मुलांची संख्या मोठी आहे़ त्यामुळे त्यांच्या तसेच त्यांच्या पालकांच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. जात आहे़ आतापर्यंत २२ पोलीस ठाण्यांमध्ये अशा बैठका घेण्यात आल्या आहेत़
या मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय मदत करता येतील़ शिक्षण घेण्यासाठी मदत हवी आहे का? काही मुले आता १८ वर्षांची झाली आहेत़ त्यांना नोकरीची गरज असते़ त्याच्यासाठी प्रयत्न केला जात आहे़
मुले आणि पालकांची दर महिन्यांना एकत्रित बैठका घेण्यात येणार असून त्यातून या मुलांना व त्यांच्या पालकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ त्यासाठी स्वंयसेवी संस्थांची मदत घेतली जात असल्याचे भोर यांनी सांंगितले़
गेल्या तीन वर्षांत सुमारे दीड हजार विधीसंघर्षग्रस्त मुले
मुले व पालकांच्या एकत्रित बैठका घेऊन त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न
स्वयंसेवी संस्थांची मदत
आतापर्यंत ३२ मुलांचे समुपदेशन
शिक्षण, नोकरीसाठी मुलांना सहाय्य
मुलांच्या हक्काचे सरंक्षण होईल याकडे लक्ष
लवकरच सर्वांचा एकत्रित मेळावा घेण्याचे नियोजन
1 एक मुलगा सातवी शिकत असताना त्याच्यावर सायकल चोरीचा आरोप झाला़ त्यामुळे तो मनातून खचला होता़ त्याचे व त्याच्या पालकांचे पोलिसांनी समुपदेशन केले़ शिक्षणासाठी मदत केली़ त्यातून तो दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे़
2या मुलांकडे व त्यांच्या पालकांकडे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर देण्यात आले आहेत़ त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले आहे़
3पोलिसांनी बोलावले म्हटल्यावर पूर्वी ही मुले व त्यांचे पालक येण्यास घाबरत असत़ त्यांना वाटायचे की हे आपल्याला एखाद्या गुन्ह्यात अडकवतील़ आता त्यांना विश्वास वाटू लागल्याने ते स्वत: होऊन विशेष बालपथकाच्या कक्षात येऊ लागले आहेत़ या सर्वांचा एकत्रित मेळावा लवकरच घेण्याचा विचार असल्याचे बाळासाहेब भोर यांनी सांगितले़