व्हिडिओ लाईकचे ३०० रुपये; पैशाच्या हव्यासापोटी HR कन्सलटंट महिलेने गमावले तब्बल २८ लाख
By नारायण बडगुजर | Updated: May 11, 2023 16:30 IST2023-05-11T16:29:55+5:302023-05-11T16:30:09+5:30
टेलिग्रामवर लिंक पाठवून विविध टास्कसाठी उकळले जातायेत लाखो रुपये, सायबर पोलिसातही अशा अनेक तक्रारी

व्हिडिओ लाईकचे ३०० रुपये; पैशाच्या हव्यासापोटी HR कन्सलटंट महिलेने गमावले तब्बल २८ लाख
पिंपरी : मानव संसाधन सल्लागार (एचआर कन्सलटन्ट) महिलेला व्हाटसॲपव्दारे लिंक पाठवून टेलीग्रामवर अकाउंट ओपन करण्यास सांगून विविध टास्क पाठवले. तसेच क्रिप्टो करन्सी प्लॅटफाॅर्मवर २८ लाख ८५ हजार रुपये पाठवण्यास सांगून फसवणूक केली. बावधन खुर्द येथे १३ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२३ या कालवधीत हा प्रकार घडला.
एचआर कन्सलटन्ट असलेल्या ५० वर्षीय महिलेले याप्रकरणी बुधवारी (दि. १०) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मोबाइल धारक असलेल्या अज्ञातांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एचआर कन्सलटन्ट आहे. आरोपींनी फिर्यादी महिलेला मेसेज करून पार्ट टाइम किंवा फुल टाइम कामाची संधी असल्याचे सांगितले. युट्यूबवरील व्हिडिओ लाइक व सबस्क्राइब करण्यास सांगितले. त्यासाठी फिर्यादी महिलेला ३०० रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी व्हाटसॲपव्दारे एक लिंक पाठविली. लिंक ओपन करून फिर्यादी महिललेला टेलिग्राम ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर फिर्यादीला अकाउंट ओपन करण्यास सांगितले. त्यानंतर विविध टास्क पाठवले. तसेच क्रिप्टो करन्सी प्लॅटफाॅर्मवर फिर्यादी यांना वेळोवेळी एकूण २८ लाख ८५ हजार पाठवण्यास सांगितले. आरोपींनी विश्वास संपादन करून फिर्यादी महिलेची फसवणूक केली. फिर्यादी महिलेने पैशांची मागणी केली असता आरोपींनी देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे तपास करीत आहेत.