भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा हंगामासाठी ऊसदर जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 18:38 IST2022-10-19T18:33:14+5:302022-10-19T18:38:43+5:30
सन २०२१-२२ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊस दर जाहीर...

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा हंगामासाठी ऊसदर जाहीर
अवसरी (पुणे) : येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संस्थापक-संचालक माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मागील सन २०२१-२२ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊस दर रु. २८००/- प्रती मेट्रिक टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
सन २०२१-२२ गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११,८६,४२६ मेट्रिक टनासाठी कारखान्याने यापूर्वी एफ.आर.पी.नुसार रु. २६४२/- प्रती मेट्रिक टनांप्रमाणे होणारी रक्कम एकरकमी ऊस उत्पादकांना अदा केलेली आहे. उर्वरित अंतिम हप्ता रु. १५८/- प्रती मेट्रिक टनामधून भीमाशंकर शिक्षण संस्था निधी रु. ८/- प्रती मेट्रिक टन वजा जाता रु. १५०/- प्रती मेट्रिक टनाप्रमाणे होणारी रक्कम रु. १७ कोटी ८० लाख ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर दि. २० ऑक्टोबर २०२२ रोजी वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याचे संस्थापक-संचालक वळसे-पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत तसेच बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन कार्यक्रमात दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस उत्पादकांची दिवाळी गोड केली आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत डिस्टिलरी प्रकल्प नसतानाही चांगला ऊसदर दिल्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कारखान्याने एफ.आर.पी.ची रक्कम वेळेत तर दिलेलीच आहे; त्याशिवाय एफ.आर.पी.पेक्षा जास्त रक्कम अंतिम हप्त्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांना अदा करण्याचे निश्चित केले आहे. गाळप हंगाम २०२२-२३ करिता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादकांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी, असे आवाहन बेंडे यांनी केले.