भारतीय सैन्य दलातून ५ दिवसाच्या सुट्टीवर आलेल्या २७ वर्षीय जवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:38 IST2025-07-31T16:37:26+5:302025-07-31T16:38:40+5:30
गेल्या दोन वर्षापासून जवान हा जम्मू-काश्मीर येथे बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन बी आर ओ मधील ड्राइंग एस्टेब्लिशमेंट सुपरवाइझर (डी.ई.एस.) या पदावर कार्यरत होता

भारतीय सैन्य दलातून ५ दिवसाच्या सुट्टीवर आलेल्या २७ वर्षीय जवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू
तळेघर : भारतीय सैन्य दलातून पाच दिवसाच्या सुट्टीवर आलेल्या सत्तावीस वर्षीय जवानाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील राजपूर येथे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले सुभाष अनिल दाते (वय२७ वर्ष) हा तरुण जम्मू काश्मीर या ठिकाणी बॉर्डर रोडस आॅर्गनायझेशन (बी.आर. ओ.) ह्या मध्ये ड्राइंग एस्टेब्लिशमेंट सुपरवाइझर (डी.ई.एस.) ह्या पदावरती कार्यरत होते.
आई वडीलांच्या मतभेदामुळे जवान सुभाष अनिल दाते हे लहानपणापासूनच मामाच्या गावी राजपुर या ठिकाणी होते. तसेच त्यांचे शिक्षण देखील याच ठिकाणी झाले होते. यांचा सांभाळ मामा चंदू सदू लोहकरे आणि आई सुमन अनिल दाते यांनी केला. सुभाष यांनी प्राथमिक शिक्षण राजपुर येथे घेतले तर पुढील बारावीपर्यंत शिक्षण त्यांनी शिनोली येथे पूर्ण घेतले. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे आयटीआय चा कोर्स पूर्ण केला. आयटीआयचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मामाच्या गावी परत आले आणि मामा, आई, मावशी व स्वतःच्या इच्छेनुसार देशाची सेवा करावायची म्हणून सुभाष दाते यांनी मनात इच्छा बाळगली. आणि त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्य दलात भरती होण्याची तयारी सुरू केली. मनामध्ये इच्छा जिद्द आणि चिकाटी च्या जोरावती ते जम्मू काश्मीर येथे बॉर्डर रोडस आॅर्गनायझेशन (बी.आर. ओ.) ह्या मध्ये ड्राइंग एस्टेब्लिशमेंट सुपरवाइझर (डी.ई.एस.) सुपरवायझर या पदावर भरती झाले. आणि स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे स्वप्न साकार करून ते देश सेवेसाठी रुजू झाले. गेले दोन वर्षापासून दाते हे जम्मू-काश्मीर येथे बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन बी आर ओ मधील ड्राइंग एस्टेब्लिशमेंट सुपरवाइझर (डी.ई.एस.)ह्या पदावर कार्यरत होते. मात्र त्यांना पुढील परीक्षेचे पेपर द्यायचे असल्याने सुभाष दाते यांनी पाच दिवसांची रजा घेऊन आपल्या मामाच्या गावी राजपुर ह्या ठिकाणी आले होते.
बुधवार दि.३० रोजी सुभाष हे झोपेतून उठले असता त्यांच्या छातीत अचानक दुखण्यास सुरु झाल्याने त्यांची आई सुमन दाते यांनी शेजारी राहणारे तुकाराम फलके यांना बोलावून सुभाष याच्या छातीमध्ये खूप दुखू लागण्याचे सांगितले. त्यांनी तात्काळ तळेघर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी घोडेगाव येथे पाठवले. डॉक्टरांनी पाहणी केली असता उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मंचर येथे शवविच्छेदन करुन राजपूर या ठिकाणी शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. सुभाष दाते हे शांत मनमिळावु स्वभावाचे होते. ते नेहमी एकमेकाच्याला मदतीला धावत असत त्यांच्या मृत्यूनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी आदिवासी भागातून मोठा जनसमुदाय समाजाला होता अनेकांचे अश्रू अनावर झाले.
या वेळी घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश पवार नायब तहसीलदार शांताराम किर्वे पोलिस पाटील उत्तम वाघमारे सतिश भोते तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथील सन्मान गार्ड पथक व परिसरातील हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.