पुणे : गेल्या बारा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या वळीव पावसामुळे २३ जिल्ह्यांमधील तब्बल २३ हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने भाजीपाला, फळपिके तसेच उन्हाळी हंगामातील पिकांचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या वळवाच्या पावसामुळे विदर्भाला मोठा फटका बसला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारीही अनेक भागात वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोणत्या पिकांचे नुकसान?कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सहा ते १६ मेपर्यंत २३ जिल्ह्यांमध्ये २३ हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या पिकांमध्ये केळी, आंबा, डाळिंब, पपई, चिकू तसेच कांदा, भाजीपाला, बाजरी, मका, लिंबू, संत्रा, उन्हाळी भात या पिकांचा समावेश आहे. पिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागातील कर्मचारी बांधावर पोहोचले असून, याचा सविस्तर अहवाल लवकरच राज्य सरकारला सादर करण्यात येईल.
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले असून, पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाईल.अजित पवार, उपमुख्यमंत्री