फळपीक विमा योजनेत २३ टक्के अर्ज बनावट; सर्वाधिक जालना जिल्ह्यातील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 08:45 IST2025-03-15T08:45:30+5:302025-03-15T08:45:52+5:30
अर्ज बाद केल्याने १३.६० कोटींची बचत

फळपीक विमा योजनेत २३ टक्के अर्ज बनावट; सर्वाधिक जालना जिल्ह्यातील
पुणे : यंदाच्या मृग बहरातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील २४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या ७३ हजार ६८६ अर्जांपैकी २३ टक्के अर्थात १६ हजार ६२० अर्ज अपात्र ठरले आहेत. प्रत्यक्षात फळबागेची लागवड नसणे, कमी क्षेत्रावर असणे किंवा उत्पादनक्षम बाग नसताना विमा संरक्षण घेतल्याचे कृषी विभागाने केलेल्या पडताळणीतून स्पष्ट झाले आहे. या अपात्र अर्जांद्वारे तब्बल ९ हजार ६५२ हेक्टर क्षेत्रावर बनावट फळपीक विमा काढण्यात आला होता. हे अर्ज बाद केल्यामुळे एकूण १३ कोटी ६० लाख रुपयांचा विमा हप्ता वाचला आहे. या अपात्र अर्जांमध्ये सर्वाधिक ७ हजार ३३४ अर्ज जालना जिल्ह्यातील आहेत.
राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहरात डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, काजू, पपई, स्ट्रॉबेरी या १३ फळ पिकांसाठी ही योजना लागू होती. त्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै होती. त्यानुसार राज्यात ७३ हजार ६८६ अर्ज आले होते. मात्र, प्रत्यक्षात फळबागेची लागवड नसणे, कमी क्षेत्रावर असणे किंवा उत्पादनक्षम बाग नसताना विमा संरक्षण घेतल्याचे कृषी आयुक्तालयाच्या निदर्शनास आले. त्यानुसार प्रत्यक्ष पडताळणी केली.
या अपात्र अर्जांद्वारे ९६५२.३२ हेक्टरवरील पिकांचा बनावट विमा उतरविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एकूण १३ कोटी ६० रुपयांचा विमा हप्त्याची बचत झाली आहे.
त्यात शेतकऱ्यांचा हिस्सा ६ कोटी ८८ कोटी, राज्य सरकारचा हिस्सा ३ कोटी ४० लाख तर केंद्र सरकारचा हिस्सा ३.३२ कोटी रुपये आहे.
या अपात्र अर्जांमध्ये सर्वाधिक अर्ज जालना जिल्ह्यातील आहे. जिल्ह्यात एकूण १८ हजार ९२२ अर्ज आले होते. त्यातील ७ हजार ३३४ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
७३ हजार ६८६ पैकी १६ हजार ६२० ठिकाणी बागांची लागवड झाली नसल्याचे तसेच प्रत्यक्ष लागवडीपेक्षा जादा क्षेत्राचा विमा काढण्यात आल्याचेही दिसून आले. काही ठिकाणी कमी वयाच्या बागा असताना त्याचाही विमा काढला असल्याचे आढळले आहे.
जिल्हानिहाय अपात्र अर्ज
जिल्हा अपात्र वाचलेला विमा
अर्ज हप्ता (रुपयांत)
अकोला १७ ५९३६०
अमरावती ५२ ३३८९५०
संभाजीनगर १३७२ १०८९५४१०
धाराशिव २६ ४२०१०
नागपूर ६२ ११४५१०
परभणी ८८२ २६८४९०
अहिल्यानगर ३११६ २२४८६४५३
बीड ५२८ ४८८४५२७
बुलढाणा ३१ ३९८७८१
धुळे ८ ९५२३२
लातूर ४ १९२२०
नाशिक २४८ १८३३०२०
पालघर २१ ३७८७९५
पुणे ३८९ ३२५२५६१
सांगली ४३३ ५८३७०५७
सातारा ५३७ २९७६१९६
सोलापूर २२९७ ११७३४५६७
ठाणे ४९ ९७८१८०
वाशिम ५ २९०७०
हिंगोली १९ ७९४००
जळगाव ३६ १८५१६२
वर्धा १ १०८०
जालना ७४४३ ६९१९१०५५
एकूण १६६२० १३६०४५०३९