विनयभंगाची तक्रार देणाऱ्याच तरुणीचे अपहरण करून बलात्कार; पुण्यात घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 18:24 IST2022-06-21T18:23:57+5:302022-06-21T18:24:09+5:30
तरुणीला ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिचे अपहरण केले

विनयभंगाची तक्रार देणाऱ्याच तरुणीचे अपहरण करून बलात्कार; पुण्यात घटनेने खळबळ
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातून एका 22 वर्षीय तरुणीने विनयभंगाची तक्रार दिल्याचा राग मनात धरून तरुणाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 जून ते 19 जून या कालावधीत हा प्रकार घडला. शकील बागवान या आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 22 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहे. आरोपीने फिर्यादी तरुणीकडे लग्नाची मागणी घातली होती. परंतु फिर्यादीने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतरही आरोपीने वारंवार तिचा पाठलाग केला. तरुणीने या प्रकरणी तक्रारही दिली होती. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्याचाच राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला मारहाण केली आणि इच्छेविरुद्ध वारंवार बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.