एमआयटी शिक्षण संकुलातील २१ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 21:00 IST2022-10-20T20:59:09+5:302022-10-20T21:00:54+5:30
मागील दोन दिवसापासून जॉर्डन हा तणावामध्ये होता...

एमआयटी शिक्षण संकुलातील २१ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीतील नामांकित एमआयटी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात डिझाईन विभागात चौथ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या बंगलोर येथील एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना आज गुरुवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
जॉर्डन पब्लिसीयेस (वय २१, मूळ रा. बेंगलोर कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्डन पब्लिसीयेस हा विद्यार्थी एमआयटी शैक्षणिक संकुलातील डिझाईन कॉलेजमध्ये चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. मागील दोन दिवसापासून जॉर्डन हा तणावामध्ये होता. दरम्यान, एमआयटीतील सुरक्षा रक्षकांना आज पाच वाजण्याच्या सुमारास जॉर्डनने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.
त्यानंतर सुरक्षारक्षकांनी तत्काळ ही माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, लोणी काळभोर पोलीस व सुरक्षारक्षकांच्या मदतीने जॉर्डनचा मृतदेह खाली उतरविण्यात आला आहे. मात्र जॉर्डन याने आत्महत्या का केली आहे, याचे कारण अद्याप समजू शकलेली नाही.
लोणी काळभोर पोलिसांनी या घटनेची माहिती जॉर्डनच्या आई-वडिलांना दिलेली आहे. जॉर्जिनचे वडील आज बेंगलोर वरून संध्याकाळी दहा वाजता विमानाने पुण्याला येणार आहेत. लोणी काळभोर पोलीस तपास करीत आहेत.