पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 16:44 IST2025-12-15T16:43:53+5:302025-12-15T16:44:09+5:30
देश स्वतंत्र झाल्यानंतर CBSE च्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल फक्त एका पॅरेग्राफमध्ये इतिहास सांगितला जायचा, तर मुघलांच्या इतिहासाला १७ पाने दिली होती.

पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
पुणे : आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर CBSE च्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल फक्त एका पॅरेग्राफमध्ये इतिहास सांगितला जायचा, तर मुघलांच्या इतिहासाला १७ पाने दिली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा इतिहास बदलला. आता मुघलांचा इतिहास कमी करण्यात आला असून, छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास पिढ्यांना शिकवण्यासाठी पुस्तकात दिला गेला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर इस्कॉन चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांना हिंदवी स्वराज्य निर्माते म्हणून गौरवले. ज्यांनी स्वाभिमान शिकवला आणि ज्यांच्यामुळे आज भगवा जिवंत आहे. कोंढव्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मला मिळाली. योगेश टिळेकर यांच्या आग्रहामुळे हा भव्य पुतळा कोंढव्याच्या भूमीवर उभा राहिला. या पुतळ्यामुळे केवळ कोंढवा बुद्रुक परिसराचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव वाढले आहे. महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करणे ही माझ्या मागच्या जन्मीची पुण्याई समजतो.
मराठ्यांनी दिल्लीचा तख्त काबीज केला
मोगलशाही, निजामशाही, आदिलशाही यांचे परकीय आक्रमण होत असताना अनेक राजे मुघलांचे मांडलिक बनले होते. अशा वेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादाने महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. १८ पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्य स्थापित केले. छत्रपती शिवराय हे दूरदृष्टीचे आणि समतेचे राज्य स्थापित करणारे राज्यकर्ते होते. त्यांच्या राज्यामध्ये गरिबाच्या भाजीच्या देठालाही बोट लावण्याची कोणाची हिंमत नव्हती. स्त्रीचा अवमान करणाऱ्यास कठोर शिक्षा दिली जात होती. त्यांनी स्वराज्य तयार केलं. त्यांनी महाराष्ट्रात तेज निर्माण केलं. छत्रपतींच्या नंतर संभाजी महाराजांनी मुघलांना झुंजवत ठेवले. ज्या औरंगजेबाने मराठ्यांना संपवण्याचा निर्धार केला होता, त्याची कबर याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आमच्या मराठ्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराजांसाठी म्हंटले जाते कि "देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था" अशा संभाजी महाराजांनी ताराराणी यांच्या नेतृत्वाखालील पुढे मराठ्यांनी दिल्लीचा तख्त काबीज केला आणि अटकेपार हिंदवी स्वराज्याचा झेंडा लावला.
मेट्रो कोंढव्यापर्यंत आणण्याचे काम सुरू
२०१८ साली कात्रज-कोंढव्याच्या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी ते आले होते. त्यातील काही काम झाले आहे आणि बाकीचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. विविध मेट्रो मार्गांना मान्यता मिळाली आहे, ज्यामुळे कोंढवा पुण्याच्या इतर भागांशी जोडला जाईल. शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रो मार्गास मान्यता मिळाली आहे. स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा मार्ग कोंढव्यापर्यंत आणण्याचे काम सुरू आहे. पुरंदर विमानतळाला जोडणारी प्रस्तावित मेट्रो देखील कोंढव्याला दिली जाईल असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.