पुणे: व्यवसायासाठी खासगी वित्तीय संस्थेकडून ८१ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एका बांधकाम व्यावसायिकाची एक कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम व्यावसायिक सेनापती बापट रस्ता भागात राहायला आहेत. त्यांची आराेपींशी गेल्यावर्षी ओळख झाली होती. बांधकाम व्यवसायासाठी माफक दरात खासगी वित्तीय संस्थेकडून ८१ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाला दाखवले होते. त्यानंतर कर्जमंजुरी प्रक्रिया, तसेच कागदपत्रांच्या पूर्ततेच्या नावाखाली आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडून वेळोवेळी एक कोटी ७८ लाख ९५ हजार रुपये घेतले. कर्जमंजुरी प्रक्रियेसाठी पैसे दिल्यानंतर आरोपींनी त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रार अर्जाची पडताळणी केल्यानंतर याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.