पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून लिफ्टच्या मोकळ्या डक्टमध्ये पडल्यामुळे १९ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास येवलेवाडीतील पिरॅमिड कन्स्ट्रक्शन साईटवर घडली. याप्रकरणी एका जणाविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी केशरीनरायन सोनी (१९ रा. लेबर कॉलनी, येवलेवाडी ) असे ठार झालेल्या तरुण मजुराचे नाव आहे. याप्रकरणी केशरीनरायन सोनी (४१ रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडीत पिरॅमिड कन्स्ट्रक्शन साईटवर बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी तक्रारदार सोनी यांचे कुटुंबिय कामाला असून, लेबर कॉलनीत राहायला आहे. २४ नोव्हेंबरला संध्याकाळी सातच्या सुमारास सनी हा इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेला होता. त्यावेळी लिफ्टसाठी ठेवलेल्या मोकळ्या जागेत पडून तो गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान १९ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, कामगारांच्या सुरक्षिततेबाबत हयगय केल्याप्रकरणी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राकेश जाधव करत आहेत.