Zilla Parishad Election : मावळात पंचायत समितीसाठी १९, तर जिल्हा परिषदेसाठी १० अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:10 IST2026-01-21T15:10:35+5:302026-01-21T15:10:50+5:30
- आज अखेरची मुदत : टाकवे बुद्रुक गट, नाणे गणाकडे तालुक्याचे लक्ष

Zilla Parishad Election : मावळात पंचायत समितीसाठी १९, तर जिल्हा परिषदेसाठी १० अर्ज दाखल
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मंगळवार (दि. २०) अखेर पंचायत समितीच्या १० गणांसाठी १९, तर जिल्हा परिषदेच्या पाच गटांसाठी १० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. टाकवे बुद्रुक (जि.प.) आणि नाणे (पं.स.) या अनुसूचित जमातीसाठी (एस.टी.) राखीव असलेल्या जागांवर अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.
निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहायक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यात ५ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नामांकन दाखल करण्यासाठी आता बुधवारचा एकच दिवस असल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीत महिला आणि सर्वसाधारण जागांवर इच्छुकांची मोठी गर्दी आहे.
पंचायत समितीसाठी
पंचायत समितीच्या टाकवे बुद्रुक (सर्वसाधारण महिला), वराळे (सर्वसाधारण) आणि कार्ला (सर्वसाधारण महिला) या तीन गणांमध्ये प्रत्येकी तीन अर्ज दाखल झाले आहेत. त्याखालोखाल इंदोरी (सर्वसाधारण), कुसगाव बुद्रुक (सर्वसाधारण), सोमाटणे आणि चांदखेड या गणांमध्ये प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत; तर खडकाळा (अनुसूचित जाती) आणि काले (सर्वसाधारण) गणांत प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. मात्र, नाणे येथील अनुसूचित जमाती (महिला) या राखीव जागेवर अद्याप पाटी कोरीच आहे.
जिल्हा परिषदेसाठी
जिल्हा परिषदेच्या आखाड्यातही चुरस निर्माण झाली आहे. पाच गटांसाठी एकूण १० अर्ज आले आहेत. यामध्ये इंदोरी (सर्वसाधारण महिला) आणि खडकाळा (सर्वसाधारण महिला) या दोन्ही गटांत तिथे प्रत्येकी तीन अर्ज दाखल झाले आहेत. कुसगाव बुद्रुक (सर्वसाधारण) आणि सोमाटणे (सर्वसाधारण महिला) गटात प्रत्येकी दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. टाकवे बुद्रुक ही जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहे, मात्र तिथेही आजअखेर एकही अर्ज दाखल झालेला नाही.