बैलगाडा शर्यती १८० बैलगाड्यांनी घेतला सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:31 IST2025-04-18T15:47:50+5:302025-04-18T16:31:52+5:30
संत ज्ञानेश्वर महाराज यात्रा उत्सवानिमित्त बैलगाड्यांच्या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले

बैलगाडा शर्यती १८० बैलगाड्यांनी घेतला सहभाग
मंचरा : नारोडी येथे संत ज्ञानेश्वर महाराज व मुक्तादेवी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत १८० बैलगाड्यांनी सहभाग घेतला. आंबेगाव तालुक्यातील नारोडी येथे चैत्र शुद्ध दशमी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा या कालखंडात यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज यात्रा उत्सवानिमित्त बैलगाड्यांच्या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रथम ६१ हजार, द्वितीय ५१ हजार, तृतीय ४१ हजार व वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली होती. एकूण १८० बैलगाडा मालकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला.नारोडी गावचे माजी उपसरपंच प्रसाद काळे ,अरविंद वळसे, नितेश तावरे सुवर्णयुग बैलगाडा संघटना या जुगलबंदीने फळीफोड करून मान संपादन केला तर घाटाचा राजा म्हणून विष्णू काशिबा हुले- नीलेश व उमेश हुले, धोंडीबा पाटीलबुवा बारवे यांच्या जुगलबंदीने सन्मान मिळविला.दुसऱ्या वर्षाचे मानकरी असलेले वीस बैलगाडे धावले.
संध्याकाळी मनोरंजनासाठी स्वर अमृत आर्केस्ट्रा याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच चैत्र शुद्ध पौर्णिमा या दिवशी मुक्तादेवी यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने चोळी पातळ मिरवणूक पारंपरिक लेझीम पथकाच्या साह्याने पार पडली. सकाळी हनुमान जन्माचे कीर्तन निवृत्ती महाराज हुले यांचे झाले. त्यानंतर मांडवडहाळे व देवीचा अभिषेक करण्यात आला. या मंदिराच्या बांधकामासाठी लोकवर्गणीतून अडीच कोटी रुपये खर्च करून मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. मंदिरापुढे राजश्री नितीन भागवत हिने सुंदर अशा प्रकारची रांगोळी रेखाटली होती.
मुक्तादेवी ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बंगाळ, उपाध्यक्ष गणेश हुले, खरेदी विक्री संघाचे संचालक नवनाथ हुले, सरपंच मंगल हुले, उपसरपंच संतोष हुले, विजय पवार, संतोष हुले, ज्ञानेश्वर नाईक, बाबूराव पिंगळे यांनी ग्रामदेवतेच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे स्वागत केले. नारोडी ग्रामस्थ यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.