शहरात १ हजार ६६७ जणांकडे ७ हजार ७३७ कोटींचा मिळकत कर थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:29 IST2025-12-02T18:03:52+5:302025-12-02T18:29:58+5:30
पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडे १ हजार ६६७ जणांकडे ७ हजार ७३७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक ...

शहरात १ हजार ६६७ जणांकडे ७ हजार ७३७ कोटींचा मिळकत कर थकबाकी
पुणे :पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडे १ हजार ६६७ जणांकडे ७ हजार ७३७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सरकारी आणि निमसरकारी संस्थांकडे थकबाकीची रक्कमच ३५५ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. महापालिकेचे नुकसान करणारी अभय योजना राबविण्यापेक्षा या बड्या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्ताकडे केली आहे.
पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडे १ कोटीपेक्षा जास्त मिळकत कराची थकबाकी असलेल्या मिळकतीची माहिती सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मागितली होती. त्यातून ही धक्कादायक आकडेवारी उघडकीस आली आहे. शहरात १ हजार ३३६ मोबाइल टॉवर्सच्या केसेस असून त्यात अडकलेली रक्कम ४ हजार ३७६ कोटी रुपये आहे.
१२३ कोटी रुपये संरक्षण खात्याची, तर ६८ कोटी रुपये महावितरणची थकबाकी आहे. या व्यतिरिक्त पीएमपीएमएलकडे १२० कोटी, बीएसएनएलकडे १४ कोटी, म्हाडा १४ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांकडे १० कोटी, विविध राज्य सरकारी खात्यांकडे १० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याचाच अर्थ सरकारी, निमसरकारी संस्थांकडील थकबाकीची रक्कमच ३५५ कोटींच्या घरात आहे. यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त वसुलीसाठी प्रयत्न केले तरी नुकसान सहन करून अभय योजनेतून मिळणाऱ्या रकमेएवढे पैसे यांच्याकडून मिळतील. उर्वरित बड्या थकबाकीदारांपैकी ज्यांची प्रकरणे कोर्टात प्रलंबित आहेत तिथे विधी विभागाकडून प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे, असे विवेक वेलणकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.