थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून कारवाई मोहीम तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 14:37 IST2025-03-15T14:36:24+5:302025-03-15T14:37:26+5:30

निवासी व बिगरनिवासी अशा एकूण १०५१ मालमत्ता जप्त केल्या

16 thousand 265 properties of defaulters sealed; Municipal Corporation intensifies action campaign | थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून कारवाई मोहीम तीव्र

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून कारवाई मोहीम तीव्र

पिंपरी : मार्चअखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल १६ हजार २६५ थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या आहेत. निवासी व बिगरनिवासी अशा एकूण १०५१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. कारवाईच्या वेळेस थकबाकीसह संपूर्ण मालमत्ताकराचा भरणा केल्याने १५ हजार २१४ मालमत्तांवर कारवाई केली गेली नाही.

कर संकलन विभागास एक हजार कोटी रुपये वसुलीचे २०२४-२५ या आर्थिक वर्षांत उद्दिष्ट आहे. मार्च महिना संपण्यास केवळ १९ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल १६ हजार २६५ थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.

कारवाईच्या वेळेस एकूण १५ हजार २१४ मालमत्ताधारकांनी संपूर्ण बिल भरल्याने कारवाई करण्यात आली नाही. त्यांच्याकडून एकूण १३८ कोटी ४१ लाख ७२ हजार ५७३ रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. १०५१ मालमत्ताधारकांनी कारवाईच्या वेळेस बिल न भरल्याने त्या मालमत्ता सील करून जप्त केल्या आहेत. या थकबाकीदारांकडून एकूण २६ कोटी ५५ लाख ३१ हजार ३१८ रुपये असा थकीत कर येणे बाकी आहे.
 
दिवसभरात ४०७ मालमत्तांवर कारवाई

कर संकलन विभागाच्या विविध १८ पथकांनी थकबाकीदारांच्या एकूण ४०७ मालमत्तांवर कारवाई केली. त्यातील ४०४ थकबाकीदारांनी कारवाईच्या वेळेस थकीत बिलाचा भरणा केला. ती रक्कम एकूण ३ कोटी ११ लाख ५९ हजार ७४८ रुपये इतकी आहे. त्यामुळे त्या थकबाकीदारांवर मालमत्ता सीलची कारवाई केली नाही, तर ३ जणांनी बिलाचा भरणा न केल्याने त्यांच्या मालमत्ता सील केल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण २ लाख ५९ हजार ४९३ रुपयांची थकबाकी आहे.

संपूर्ण बिल भरल्यानंतरच सील उघडणार

कारवाईची वाट न पाहता थकबाकीदारांनी संपूर्ण थकीत मालमत्ताकर एकरकमी भरून महापालिकेस सहकार्य करावे. कर संकलन विभागाने वसुली मोहीम अधिक तीव्र केली आहे. संपूर्ण बिलाचा भरणा केल्याशिवाय मालमत्तेस लावलेले सील काढले जात नाही. जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. -अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, कर संकलन विभाग

Web Title: 16 thousand 265 properties of defaulters sealed; Municipal Corporation intensifies action campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.