पीएमपीचे मोबाइल ॲप १५ लाख प्रवाशांनी केले डाउनलोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:59 IST2025-06-03T19:57:57+5:302025-06-03T19:59:37+5:30
‘आपली पीएमपी मोबाइल ॲप’मुळे प्रवाशांना गाड्यांची वेळ, ठिकाण लाइव्ह दिसते. त्यामुळे दैनंदिन प्रवासी संख्येचा विचार करता जवळपास ९० टक्के प्रवासी डिजिटल पद्धतीचा अवलंब करत आहेत

पीएमपीचे मोबाइल ॲप १५ लाख प्रवाशांनी केले डाउनलोड
- अंबादास गवंडी
पुणे : शहरातील प्रवास सुलभ व्हावा यासाठी रिअल-टाइम बस ट्रॅकिंग, रूट मार्गदर्शन, ऑनलाइन तिकीट बुकिंग, पास व्यवस्थापन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना देण्यासाठी पीएमपीने ‘आपली पीएमपी मोबाइल ॲप’ चार महिन्यांपूर्वी सुरू केले होते. सुरुवातीला ॲप डाउनलोड करण्याचे प्रमाण कमी होते. परंतु आता या मोबाइल ॲपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १५ लाख पुणेकर प्रवाशांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. शिवाय वापरताना येणाऱ्या अडचणी कमी झाल्यामुळे प्रवाशांना सोयीचे झाले आहे.
‘आपली पीएमपी मोबाइल ॲप’मुळे प्रवाशांना गाड्यांची वेळ, ठिकाण लाइव्ह दिसते. त्यामुळे दैनंदिन प्रवासी संख्येचा विचार करता जवळपास ९० टक्के प्रवासी डिजिटल पद्धतीचा अवलंब करत आहेत. या ॲपद्वारे बसचा मार्ग, वेळापत्रक, थांबे याची त्वरित माहिती मिळते, तिकीट खरेदी करणेही सोपे झाले आहे. सुरुवातीला ॲपला कमी प्रतिसाद होता. आता वापरकर्ते वाढले आहेत. त्यामुळे ही संख्या १५ लाखांपेक्षा जास्त पोहोचली आहे. शिवाय आयफोनधारक प्रवासी ॲप डाउनलोड करत आहे. त्यामुळे मोबाइल ॲपचे वापरकर्ते वाढत आहे.
सर्व सेवा एकाच ॲपमध्ये
प्रवासी थांबलेल्या ठिकाणावरून इच्छित स्थळाची बसमार्गाची माहिती मिळते. मोबाइल ॲपमधून प्रवाशांना आपल्या बसचे लाइव्ह लोकेशन दिसत असल्यामुळे बस थांब्यावर बस किती वेळात येणार हे समजते. तसेच ॲपवरून यूपीआयचा वापर करून तिकीट बुक करता येते. प्रवाशांना दैनंदिन पास काढण्याची सुविधादेखील ॲपमध्ये उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांना सर्व प्रकारचे पास करण्याची सुविधा आहे. यामुळे प्रवाशांना फायदा होत आहे.
अशी आहे आकडेवारी :
ॲड्राॅइड डाउनलोड - ५६,२००
आयओएस व्हर्जन - १४,८४,८४४
एकूण डाउनलोड - १५,४१,०४४
प्रवाशांना डिजिटल सुविधा मिळाल्यामुळे वापर करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पीएमपी कटिबद्ध आहे.- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी