पुणे: नळस्टॉप चौकातील महामेट्रोच्या दुहेरी उड्डाण पुलाच्या कामाला नोव्हेंबर अखेरीस सुरूवात होईल. १४ मीटर रूंदीचा हा चौपदरी पूल मेट्रोच्या खांबांच्या मध्यभागाला जोडून असेल. पुण्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच दुहेरी उड्डाणपूल असणार आहे.
नळस्टॉप चौकातील वाहतुकीवरचा सगळा ताण त्यामुळे कमी होणार आहे. सोनल हॉलपासून तो सुरू होईल व एसएनडीटी महाविद्यालयाच्या थोडे पुढे संपणार आहे. त्याची लांबी साधारण ३५० मीटर आहे. मध्यभागी तो ऊंच असेल व त्याच्या दोन्ही बाजूंना उतार असेल. कर्वे रस्त्याच्या लागून असणार्या जोडरस्त्याने ज्यांंना जायचे नाही असे सर्व वाहनधारक या पूलाचा वापर करतील. मेट्रोच्या खांबांपासून दोन्ही बाजूंना प्रत्येकी ७ मीटर रूंदीचा पूल असेल. त्याचे प्रत्येकी दोन म्हणजे एकूण चार भाग आहेत. प्रत्येक भाग साडेतीन मीटर रूंदीचा आहे. दुचाकी वाहनांसह चार चाकी वाहनांसाठीही पूल खुला असणार आहे.
कोरोना टाळेबंदी व त्यामुळे मजुरांची कमतरता यातून मेट्रोच्या एकूणच कामाचे वेळापत्रक बिघडले. आता मजूर परतले असून कामाला गतीही आली आहे. नोव्हेंबर अखेरीस पुलाच्या कामाला सुरूवात होईल. साधारण ६ महिन्यात काम पूर्ण होईल.अतुल गाडगीळ, संचालक ( प्रकल्प) महामेट्रो.---///
महामेट्रो व महापालिका संयुक्तपणे हे काम करत आहे. त्यासाठी ३५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने खर्चाचा पहिला ८ कोटी रूपयांचा वाटा दिला आहे. पूलाच्या कामाचे नियोजन महामेट्रोने केले असून पुण्यातील हा सर्वात आकर्षक पूल होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हेमंत सोनवणे, सरव्यवस्थापक, (जनसंपर्क) महामेट्रो. ---///