१३६ मिळकतीचे नळ कनेक्शन तोडले; थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कसली कंबर
By राजू हिंगे | Updated: January 31, 2025 15:29 IST2025-01-31T15:28:50+5:302025-01-31T15:29:08+5:30
महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १४ लाख २५ हजार मिळकतींना बिले देण्यात आली आहेत

१३६ मिळकतीचे नळ कनेक्शन तोडले; थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कसली कंबर
पुणे : महापालिकेच्या मिळकत कर विभागाने थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली असून, गेल्या दोन महिन्यात तब्बल ७० हजार थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीसा दिल्या आहेत. तसेच थकबाकीदारांच्या मिळकतीचे नळ कनेक्शन ताेडण्याची कारवाई जोरात सुरू केली आहे. यात आतापर्यंत १३६ मिळकतीचे कनेक्शन तोडले आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे मिळकत कराची थकबाकी वसुली हाेण्यास वेग मिळाला आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १४ लाख २५ हजार मिळकतींना बिले देण्यात आली आहेत. त्यातील आठ लाख मिळकतधारकांनी सुमारे २ हजार कोटींचा कर भरला आहे. तर अद्यापही सहा लाख थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. त्यामुळे महापालिकेकडून या थकबाकी वसुलीसाठी बॅंड पथक, तसेच जप्तीची कारवाई केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकेही नेमण्यात आलेली आहेत. या पथकांंना दैनंदिन कामकाजासह वसुलीचेही काम करावे लागत असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पेठ निरीक्षकांना तशा सूचना दिल्या आहेत.
शहरातील थकबाकीदारांचे नळजोड तोडण्याची कारवाई महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून हाती घेण्यात आली होती. त्यानुसार, गेल्या दिड महिन्यात कर संकलन विभागाने १३६ मिळकतींचे नळजोड तोडले होते. त्यानंतर लगेचच थकबाकीदारांकडून कर भरण्यात आल्याने हे नळजोड टप्प्या टप्प्याने पैसे जमा झाल्यानंतर सुरू करण्यात येत आहेत. मात्र, सोसायट्यांमध्ये अशी कारवाई महापालिका प्रशासनास करता येत नसल्याचेही समोर आले आहे.
अनेक सोसायट्यांमध्ये ६० ते ७० सदस्यांनी कर भरलेला असून, ज्या सदस्यांनी कर भरलेला नाही त्यांच्यावर कारवाई करायची असल्यास सोसायटीचे पाणी बंद करणे शक्य नाही; त्यामुळे सोसायट्यांनी संबधित सदस्यांना कर भरण्यासाठी सूचना द्यावी यासाठी कर संकलन विभाग सोसायट्यांना देखील पत्र देत आहे. ‘कर्मचाऱ्यांना दररोज दहा मिळकतींकडून थकबाकी वसुलीचे तसेच जप्ती व लिलावाची कारवाई करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या कामासाठी अन्य विभागातील अतिरिक्त ७५ कर्मचारी कर विभागात नियुक्त करण्यात आले आहेत.