12th exam result will be distributed on 11th june | ११ जूनला मिळणार बारावीच्या गुणपत्रिका
११ जूनला मिळणार बारावीच्या गुणपत्रिका

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारवीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सर्व विद्यार्थ्यांना येत्या मंगळवारी (दि.११) दुपारी ३ वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे,असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

राज्य मंडळातर्फे २८ मे रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. मात्र,निकाल जाहीर होवून दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून कनिष्ठ महाविद्यालयाकडे विचारणा केली जात होती. अखेर येत्या मंगळवारी दुपारी ३ वाजता सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी व ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थीनी आहेत. राज्यातील ९ हजार ७७१ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.

यंदा विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख ६९ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी त्यापाठोपाठ कला शाखेतून ४ लाख ८२ हजार ३७२ तर वाणिज्य शाखेतील ३ लाख ८१ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ५८ हजार १२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले. राज्य मंडळाच्या मुंबई विभागातून सर्वाधिक ३ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत तर सर्वात कमी ३२ हजार ३६२ विद्यार्थी कोकण विभागातून परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. 


Web Title: 12th exam result will be distributed on 11th june
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.