पीएमपीच्या ताफ्यात १ हजार बस दाखल होणार; एका बसची किंमत ४८ लाख
By राजू हिंगे | Updated: May 13, 2025 20:08 IST2025-05-13T20:08:28+5:302025-05-13T20:08:41+5:30
सध्या ३०० ते ३५० बस सतत नादुरुस्त होत असल्याने त्या ताफ्यातून काढाव्या लागणार आहेत

पीएमपीच्या ताफ्यात १ हजार बस दाखल होणार; एका बसची किंमत ४८ लाख
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)च्या ताफ्यात स्व मालकीच्या १ हजार बसेस लवकर दाखल होणार आहे. पुणे महापालिका ३०० आणि पिंपरी-चिंचवड महापालिका २००आणि ‘पीएमआरडीए’कडून ५०० बस देण्याच्या निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. १२ मीटर लांबीची बस असून सीएनजीवरील एका बसची किंमत ४८ लाख रूपये आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत १ हजार बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपीसाठी पुणे महापालिका ३०० आणि पिंपरी-चिंचवड महापालिका २०० बस घ्यावेत, असे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे महापालिका ६० टक्के आणि पिपंरी चिचंवड महापालिका ४० टक्के निधी देणार आहे. १२ मीटर लांबीची बस आहे. या बस ‘सीएनजी’वरील असणार आहेत. , अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त आणि पीएमपीएमएलचे संचालक डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
सीएनजीवरील एका बसची किंमत ही ४८ लाख रुपयांपर्यंत आहे. पीएमपीला नव्याने बस मिळाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील फेऱ्यांमध्ये वाढ होईल. सध्या ३०० ते ३५० बस सतत नादुरुस्त होत असल्याने त्या ताफ्यातून काढाव्या लागणार आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत बससेवा देण्यात येते. त्यामुळे ‘पीएमआरडीए’तर्फे पुणे महानगर परिवहन महामंडळाला स्वमालकीच्या ५०० बस देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी २३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पीएमपीकडून पीएमआरडीएच्या हद्दीतील १२२ मार्गावर ५०३ बसमार्फत प्रवासी सेवा दिली जाते. बस खरेदीची लवकरच सर्व प्रशासकीय बाबी पुर्ण करून निविदा काढली जाणार आहे.