दगडांचा धाक दाखवून सिनेमा लेखकाचे दहा लाख रुपये लुटले; चित्रपटाच्या हार्ड डिस्कही पळवल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 17:30 IST2022-06-06T17:28:28+5:302022-06-06T17:30:45+5:30
दरोडा प्रकरणी पाच जणांना अटक

दगडांचा धाक दाखवून सिनेमा लेखकाचे दहा लाख रुपये लुटले; चित्रपटाच्या हार्ड डिस्कही पळवल्या
पिंपरी : दहा ते बारा जणांनी दगडांचा धाक दाखवून सिनेमा लेखकाकडून दहा लाख रुपये व चित्रपटाच्या सहा हार्ड डिस्क जबरदस्तीने घेऊन पळून गेले. पुणे मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे शनिवारी दुपारी चार ते साडेचार या कालावधीत ही घटना घडली. दरोडा प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात रविवारी (दि. ५) गुन्हा दाखल करण्यात आला.
शंकर निवृत्ती भेंडेकर (वय २९, रा. पिंपरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. लिंबाजी भीमराव मुंढे (वय ३८), संग्राम अशोक मुंढे (वय २६, दोघेही रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ), ज्ञानेश्वर बजरंग सकट (वय १९, रा. शिरगाव, ता. मावळ), सुमित सुरेश कदम (वय २३, रा. गोडुंब्रे, ता. मावळ), अमर मारप्पा वाघमारे (वय ३०, रा. मामुर्डी, देहूरोड) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासह इतर अनोळखी आठ ते दहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर भेंडेकर हे सिनेमा लेखक आहेत. चित्रपटासाठी लिंबाजी मुंढे याने पैसे दिले होते. त्यामुळे लिंबाजी याला पैसे देण्यासाठी फिर्यादी भेंडेकर हे शनिवारी दुपारी लिंबाजी याच्या ऑफिस समोर गेले. त्यावेळी आरोपींनी शंकर भेंडेकर यांना दगडांचा धाक दाखवून त्यांच्याकडील दहा लाख रुपये, संमती पत्र, हक्कसोडपत्र व पखवाज या फिल्मच्या सहा हार्ड डिस्क जबरदस्तीने पळवून घेऊन गेले, असे फिर्यादीत नमूद आहे.
दरोडा प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक महेश मतकर तपास करीत आहेत.