गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटी ११ लाखांची फसवणूक, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: January 12, 2024 17:53 IST2024-01-12T17:52:58+5:302024-01-12T17:53:43+5:30
फिर्यादी ढमाले हे चेक घेऊन बँकेत गेले असता आरोपींनी बँकेतून पेमेंट स्टॉप केल्याचे बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले...

गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटी ११ लाखांची फसवणूक, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : विकसित करण्यात येणाऱ्या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास करोडो रुपयांचा नफा होईल असे सांगून एकाची १ कोटी ११ लाख ४५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रताप बाळासाहेब ढमाले (४३, रा. भेलकेनगर, कोथरूड) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अण्णा तुकाराम लष्करे (५७), अनिल सर्जेराव पवळ (४७, रा. वारजे) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २००८ ते गुन्हा ११ जानेवारी २०२३ या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी अण्णा लष्करे आणि अनिल पवळ यांनी फिर्यादी प्रताप ढमाले यांना अहमदनगर येथील एक जागा विकसित करण्यासाठी गुंतवणूक केल्यास करोडो रुपयांचा नफा होईल असे आमिष दाखवले. यावर फिर्यादी ढमाले यांनी विश्वास ठेऊन वेळोवेळी रोख आणि चेकच्या माध्यमातून १ कोटी ११ लाख ४५ हजार रुपये दिले.
यानंतर ढमाले यांनी ही रक्कम परत मागितली असतांना आरोपींनी २ चेक दिले. फिर्यादी ढमाले हे चेक घेऊन बँकेत गेले असता आरोपींनी बँकेतून पेमेंट स्टॉप केल्याचे बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. अशा प्रकारे आरोपी अण्णा लष्करे आणि अनिल पवळ यांनी ढमाले यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजित बढे करत आहेत.