"Will you ask CM Uddhav Thackeray about the safety of women's in Maharashtra?" BJP to NCP, Congress | “महाराष्ट्रातील लेकी-सुनांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाब विचारणार का?”

“महाराष्ट्रातील लेकी-सुनांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाब विचारणार का?”

ठळक मुद्देहाथरस येथील घटनेविरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला अधिकार आहेगेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात महिला, तरुणी, अल्पवयीन मुली, बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात काय केले आहे?महाराष्ट्रात कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रूग्णांवर बलात्कार, विनयभंगासारख्या संतापजनक घटना घडलेल्या आहेत.

मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेवरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही चांगलचं पेटलं आहे. राज्यात हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने सत्ताधारी काँग्रेस, शिवसेना आंदोलन करतंय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. यूपी सरकारवर टीका करण्याचे अधिकार जरूर आहेत पण महाराष्ट्रातील लेकी-सुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्याच्या समोर कधी प्रश्न उपस्थित करणार? गेल्या सहा महिन्यांत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे काय? असा प्रश्न भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत केशव उपाध्ये म्हणाले की, हाथरस प्रकरण दुर्दैवीच आहे आणि त्याची दखल घेत तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करत प्रकरण सीबीआयकडे दिले, पण इथे गेल्या सहा महिन्यांत ज्या घटना घडल्या त्यांवर किती कारवाई झाली? इतर ठिकाणची उठाठेव जरूर करा पण आपल्या अंगणात काय सुरू आहे हे कधी पहाणार? असा टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

तसेच हाथरस येथील घटनेविरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला अधिकार आहे, मात्र त्याच बरोबर हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रातील सरकारमध्ये सहभागी आहेत, त्या सरकारने गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात महिला, तरुणी, अल्पवयीन मुली, बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात काय केले आहे, हे ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्याचे धाडस दाखवावे. महाराष्ट्रात कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रूग्णांवर बलात्कार, विनयभंगासारख्या संतापजनक घटना घडलेल्या आहेत. पनवेल, पुणे, इचलकरंजी, नंदुरबार, चंद्रपूर येथे विलगीकरण केंद्रात महिला, तरुणींवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत याकडे भाजपाने लक्ष वेधलं आहे.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे शासकीय लॅबमधील टेक्निशियनने कोरोना चाचणीच्या नावाखाली युवतीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याची घटना घडली आहे. फेब्रुवारीमध्ये ७ वेगवेगळ्या घटनांमध्ये युवती/महिलांना जिवंत जाळले गेले. हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरारोड, लातूर, नागपूर, लासलगाव या ठिकाणी या घटना घडल्या. यातील चौघींना जीवाला मुकावे लागले. या घटनांचे गांभीर्य बाळासाहेब थोरात किंवा काँग्रेस तसेच राष्ट्रवादी व शिवसेनेला समजलेले नाही, असं म्हणायचे कां? असा सवालही भाजपाने उपस्थित केला आहे.

योगी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर

हाथरसमधील मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या हत्येनंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले होते. विरोधी पक्षांशिवाय भाजपामधील नेत्यांनीही पीडितेचा मृतदेह जाळल्याच्या प्रकरणाबाबत योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी शनिवारीही पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी हाथरस येथे पोहोचले, तेव्हा मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करुन अटक केली होती. काँग्रेसशिवाय समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षानेही योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

जातीय दंगल भडकवण्याचं षडयंत्र; योगींचा गंभीर आरोप

विरोधक उत्तर प्रदेशात जातीय दंगल पेटवण्याचं षडयंत्र रचत आहेत. राज्यातील विकास कामं रोखण्यासाठी विरोधक असं राजकारण करत आहेत. ज्यांना विकास होत असलेला आवडत नाहीत असे लोक देशात आणि राज्यात जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दंगलीच्या माध्यमातून राज्यातील विकास थांबेल आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याची संधी मिळेल असं विरोधकांना वाटत आहे असा आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. तसेच या षडयंत्रांविरोधात पूर्ण ताकदीनं आपल्याला लढून विकासप्रक्रिया पुढे घेऊन जावी लागेल असंही ते म्हणाले आहेत.

Web Title: "Will you ask CM Uddhav Thackeray about the safety of women's in Maharashtra?" BJP to NCP, Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.