फडणवीस १०० आमदार निवडून आणतात; बाळासाहेबांना ते का जमलं नाही? संजय राऊत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 11:08 AM2021-06-19T11:08:34+5:302021-06-19T11:12:41+5:30

राज्यात काँग्रेस प्रदिर्घकाळ सत्तेत असतानाही शिवसेना टिकली; हेच शिवसेनेचं यश असल्याचं संजय राऊत म्हणाले

why shiv sena never wins more than 100 seats in assembly election mp sanjay raut explains | फडणवीस १०० आमदार निवडून आणतात; बाळासाहेबांना ते का जमलं नाही? संजय राऊत म्हणतात...

फडणवीस १०० आमदार निवडून आणतात; बाळासाहेबांना ते का जमलं नाही? संजय राऊत म्हणतात...

Next

मुंबई: गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. मुख्यमंत्र्यांचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली. त्यामुळे सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही भारतीय जनता पक्षाला विरोधात बसावं लागलं. फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं शंभरपार मजल मारली. मात्र शिवसेनेला आतापर्यंत कधीही ८० च्या पुढे जाता आलेलं नाही. यामागचं कारण काय, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या प्रश्नाला शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे.

काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेला सेना-राष्ट्रवादी युतीचा उतारा?

'दहा-वीस जागा जास्त जिंकल्या म्हणून कोणी मोठा होत नाही. सत्ता येत जात असते. आम्ही तर बराच काळ विरोधी पक्षात राहिलो. मात्र तरीही पक्ष टिकला. शिवसेना मुंबई-ठाण्याची वेस ओलांडेल, असंही कोणाला वाटलं नव्हतं. मात्र आम्ही महाराष्ट्रभर पोहोचलो आणि ५५ वर्षे टिकलो,' असं संजय राऊत यांनी 'साम' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 

देवेंद्र फडणवीस यांनी शंभरहून अधिक जागा जिंकून दाखवल्या. पण बाळासाहेब ठाकरे असतानाही शिवसेनेला हा करिश्मा करून का दाखवता आला नाही? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. 'ममता बॅनर्जींसमोर पश्चिम बंगालमध्ये कोणाचंही आव्हान नाही. तिथे काँग्रेस जवळपास नाहीच. तमिळनाडूत दोन प्रबळ प्रादेशिक पक्ष आहेत. तिथे काँग्रेसला संधी नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष आहे. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव बराच काळ सत्तेत होते. पण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही,' असं राऊत यांनी सांगितलं.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचाही काँग्रेसला सूचक इशारा: “स्वबळावर ठाम राहिलात तर...”

'महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा जनाधार आहे. काँग्रेस पक्ष देशात इतर राज्यांत पराभूत होत असतानाही महाराष्ट्रानं काँग्रेसला आधार दिला. सहकाराच्या माध्यमातून राज्यात जितकं काम झालं, तितकं देशात अन्यत्र कुठेही झालेलं नाही. काँग्रेसची पाळमुळं इतकी घट्ट असतानाही शिवसेना राज्यात वाढली. ५५ वर्षे टिकली. हेच शिवसेनेचं यश आहे,' असं संजय राऊत म्हणाले.

राज्यात चार प्रमुख पक्ष आहे. प्रत्येकाची स्वतंत्र स्पेस आहे. शरद पवारांची ताकद आहे. काँग्रेसला मानणारा मतदार आहे. म्हणून तर गेल्या निवडणुकीत कोणताही नेता नसताना त्यांचे ४० हून अधिक आमदार निवडून आले. कधीकाळी डाव्यांची संपूर्ण देशात ताकद होती. डावे देश चालवायचे. मात्र आता त्यांचा आवाज क्षीण झाला. आमचा आवाज क्षीण झालेला नाही. आमचा आवाज कायम आहे, असं राऊत यांनी सांगितलं.
 

Web Title: why shiv sena never wins more than 100 seats in assembly election mp sanjay raut explains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app