West Bengal Assembly Elections 2021 bengal elections bjp faces problem in ticket candidate list workers protest | बंगालमध्ये भाजपा विरुद्ध भाजपा?; बाहेरच्यांना तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांचा राडा, कार्यालयाची केली तोडफोड

बंगालमध्ये भाजपा विरुद्ध भाजपा?; बाहेरच्यांना तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांचा राडा, कार्यालयाची केली तोडफोड

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे (West Bengal Assembly Election 2021) राजकारण तापलं आहे. सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. विशेषत: भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत भाजपाने आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र आता बंगालमध्ये भाजपा विरुद्ध भाजपा असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बाहेरच्या लोकांना तिकीट दिल्याने भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. बंगालमधील अनेक शहरात रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू केली आहेत. 

भाजपाने बंगालच्या अलीपूरद्वार विधानसभा मतदारसंघात अर्थतज्ज्ञ अशोक लाहिरी यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. लाहिरी यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. एवढेच नव्हे तर आम्ही लाहिरींना उमेदवारच मानत नाही, असं भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांना सुनावलं. त्यामुळे अखेर पक्षाने लाहिरी यांचं तिकीट कापून जिल्हा महासचिव सुमन कांजीलाल यांना तिकीट दिलं आहे. 

जगतादल आणि जलपाईगुडीमध्येही असाच काही प्रकार झाला. भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर या दोन्ही मतदारसंघात टीएमसीतून आलेल्यांना तिकीट दिल्याचं कार्यकर्त्यांना समजलं. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी थेट तोडफोडच सुरू केली. जगतादलमध्ये भाजपाने अरिंदम भट्टाचार्य यांना तिकीट दिलं होतं. मात्र कार्यकर्त्यांनी विरोध सुरू केला. जलपाईगुडीतही असंच झालं. इथे तर कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयातच तोडफोड केली. मालदाच्या हरिशचंद्रपूरमध्येही कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात तोडफोड केली. या ठिकाणी भाजपाने मातिउर रहमान यांच्या नावाची घोषणा केली. 

मातिउर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांना तिकीट दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केली. मालदाच्या ओल्डा मालदा सीटमध्ये गोपाल साहा यांच्या नावाची घोषणा केली. त्याला भाजपा कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध करत जोरदार निदर्शने केली. या ठिकाणीही भाजपा कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात तोडफोड केली. गोपाल साहा यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचंच नुकसान होणार आहे असं येथील भाजपा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करत याचा निषेध नोंदवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"बंगालमध्ये दीदींचा खेळ संपला, TMC म्हणजे 'ट्रान्सफर माय कमिशन"; पंतप्रधान मोदींचा सणसणीत टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुरुलिया येथे रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन असल्याचं म्हणत निशाणा साधला. तसेत दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’, असं म्हणत पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींना सणसणीत टोला देखील लगावला आहे. "भाजपाचा डीबीटी डायरेक्ट बेनिफट ट्रान्सफर, तर TMC ट्रान्सफर माय कमिशन" बनली असल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला आहे. केंद्रातील भाजप सरकार डीबीटी म्हणजे गरजूंना थेट मदत करणारी डायरेक्ट ट्रान्स्फर बेनेफिट योजना राबविते, तृणमूल काँग्रेस मात्र लोकांना लुटण्याचे काम करते, असे सांगताना मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नाव टीएमसी अर्थात ट्रान्सफर माय कमिशन असल्याची घणाघाती टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खेला होबे (खेळ होईल) या विधानसभा निवडणुकीच्या बहुचर्चित घोषणेला नरेंद्र मोदी यांनी पुरुलिया येथील राज्यातील पहिल्या प्रचारसभेत विकास होबे (विकास होईल) असे उत्तर दिले.

 

Web Title: West Bengal Assembly Elections 2021 bengal elections bjp faces problem in ticket candidate list workers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.