उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला, आता श्रीनिवास वनगांना विधिमंडळात पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:51 PM2019-03-26T14:51:18+5:302019-03-26T14:52:07+5:30

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

uddhav thackeray U-turn, Sena to give Palghar to BJP's Gavit | उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला, आता श्रीनिवास वनगांना विधिमंडळात पाठवणार

उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला, आता श्रीनिवास वनगांना विधिमंडळात पाठवणार

Next

मुंबई- उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंनी राजेंद्र गावितांना शिवबंधन बांधलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही पत्रकारांशी संवाद साधला. श्रीनिवास वनगांना डावलल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. श्रीनिवास वनगांना संसदेत पाठवायची माझी इच्छा होती. पण त्यांची विधिमंडळात काम करण्याची इच्छा आहे. श्रीनिवास वनगानं मला विधिमंडळात काम करू द्या, असं सांगितलं. त्याच्या इच्छेचा मी आदर राखतो, त्याला कोणत्याही मार्गानं आमदार म्हणून विधिमंडळात पाठवणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंनी गेल्या वर्षी झालेल्या पालघर पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं. चिंतामण वनगांचं निधन झाल्यानं त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. लोकभावना प्रबळ होती. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. युती म्हणून लढत असताना आमचे जास्तीत जास्त खासदार निवडून येणं गरजेचं आहे. आमच्या सुभाष भामरे, सुरेश प्रभू, प्रताप पाटील चिखलीकरांनाही भाजपानं उमेदवारी दिली आहे. त्यामुळेच राजेंद्र गावितांना पालघर मतदारसंघातून आम्ही उमेदवारी दिली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  

पालघर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार हे आता स्पष्ट झालं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं 25-23चा फॉर्म्युला तयार केला आहे. यावेळी भाजपानं पालघरची जागा शिवसेनेला सोडली आहे. चिंतामण वनगा यांचे गेल्या वर्षी जानेवारीत दिल्लीत निधन झाले होते. त्यानंतर त्या जागेसाठी त्यांचे पुत्र इच्छुक होते. परंतु भाजपानं त्यांना डावलून राजेंद्र गावितांना उमेदवारी दिल्यानं श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी पोटनिवडणूक लढवली होती.

परंतु ते पराभूत झाले. मात्र त्यांनी भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना चांगली टक्कर देत जवळपास अडीच लाख मतं मिळवली. त्यामुळे ही जागा शिवसेनेसाठी यंदा सोडण्यात आली. पण शिवसेनेकडून पालघरमध्ये यंदा पुन्हा भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित उमेदवारी मिळाली असून, ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.

Web Title: uddhav thackeray U-turn, Sena to give Palghar to BJP's Gavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.