धमक्या देणारा पहिला मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 05:53 PM2020-11-29T17:53:48+5:302020-11-29T17:54:27+5:30

Chandrakant Patil : महाविकास आघाडीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण दिवस झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आघाडी सरकारच्या एक वर्षातील कामगिरीचे वाभाडे काढले.

Uddhav Thackeray targeted by Chandrakant Patil, the first Chief Minister to make threats | धमक्या देणारा पहिला मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

धमक्या देणारा पहिला मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Next
ठळक मुद्देपाटील म्हणाले, तीनही पक्षांमध्ये वर्षभरात फक्त खुर्चीसाठीची धडपड पहायला मिळाली. अपमान सहन करायचे, आपसात भांडण करत बसायचे, पुन्हा खोटा सामोपचार घडवायचा असे प्रकार सुरु आहेत.

पुणे : मुख्यमंत्र्यांची भाषा ही धमक्यांची भाषा आहे. दसरा मेळावा असो नाहीतर मुलाखत असो विरोधकांना वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. तुम्हाला जी कारवाई करायची ती करा. आम्ही तुम्हाला घाबरत नाही, असे आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

महाविकास आघाडीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण दिवस झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आघाडी सरकारच्या एक वर्षातील कामगिरीचे वाभाडे काढले. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक गणेश बिडकर, प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, तीनही पक्षांमध्ये वर्षभरात फक्त खुर्चीसाठीची धडपड पहायला मिळाली. अपमान सहन करायचे, आपसात भांडण करत बसायचे, पुन्हा खोटा सामोपचार घडवायचा असे प्रकार सुरु आहेत.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून या काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कोरोना काळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले असून राज्यातील रुग्णांची संख्या 177 देशातील रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे. या काळात सर्वेक्षण व्यवस्थित झाले नाही, लवकर निदान करण्यात आले नाही. या काळात स्थलांतरीतांचे हाल झाले.

यासोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना सत्तेत येण्यापुर्वी 50 हजार देण्याची मागणी करणारे मुख्यमंत्री शब्द फिरवित केवळ दहा हजार रुपयांची मदत देतात. निम्म्या शेतक-यांना कर्जमाफीच मिळालेली नाही. नियमित हप्ते भरणा-यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदानही मिळालेले नाही.

महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून शिक्षणाचाही या सरकारच्या काळात बट्ट्याबोळ झाल्याचे पाटील म्हणाले. गोंधळलेल्या सरकारने आॅनलाईन परीक्षांचा फार्स केला आहे. विधानसभा निवडणुकपुर्व झालेली भाजपा-सेनेची युती तोडून शिवसेनेने अकृत्रिम सरकार स्थापन केले. लोकांनी नाकारलेले पक्ष सत्तेत आले. त्यामुळे सर्वात अधिक आमदार येऊनही विरोधी पक्षात बसावे लागले.

मराठा आरक्षणाचे या सरकारने मातेरे करुन ठेवले आहे. फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण या सरकारला टिकविता आले नाही. आम्ही ओबींसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी रचना केली होती. परंतु, हे सरकार ओबीसींना सतत अस्वस्थ करीत आहे. सामाजिक सौहार्दाची वीण उसविण्याचे काम हे सरकार करीत असून समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

संजय राऊत फार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलणेच बंद केले आहे. गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेली बैठक राऊत यांना होणार होती का? सुप्रिया सुळे यांनी मोदींचे विदेश दौरे आणि पुण्यात निर्माण होणारी लस यावर केलेली टिपण्णी हास्यास्पद असल्याचे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील ‘अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शन’च्या गेममुळे जनेतेचे नुकसान
जयंत पाटील म्हणतात, चंपा म्हणाले तर बिघडले कुठे? तर, मग आम्हीही उद्धव ठाकरेंना  ‘उठा’, शरद पवारांना  ‘शपा’, जयंत पाटील यांना  ‘जपा’ असे आम्हीही म्हणू शकतो. तुम्ही आम्हाला विशेषणे लावणार असाल तर आम्हालाही बोलता येते. परंतु, ही राजकीय संस्कृती नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून यावर विचार करायला हवा. जनतेच्या विकासाठी राजकीय आचारसंहिता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे पाटील म्हणाले.

सत्ताधारी महाविकास आघाडीने अधिवेशन घेण्याची हिम्मत दाखवावी. मग आम्ही सरकारचे कसे वाभाडे काढतो ते पहाच. परंतु, अधिवेशनाला सामोरे जाण्याची हिम्मत हे सरकार दाखविणार नाही. ज्यांना असे वाटते की भाजपा नेत्यांवर कारवाई होत नाही. त्यांनी भाजपा नेत्यांबद्द्ल खुशाल तक्रारी कराव्यात. अविनाश भोसले यांची चौकशी ही अन्य चौकशीसारखीच आहे. यंत्रणांकडून चौकशी होत असते असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Uddhav Thackeray targeted by Chandrakant Patil, the first Chief Minister to make threats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.