बिहार विधानसभेला घेराव घालण्यावरून राजद कार्यकर्त्यांची दगडफेक, तेजस्वी-तेजप्रताप यादव ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 14:11 IST2021-03-23T14:10:27+5:302021-03-23T14:11:29+5:30
Bihar Vidhansabha Gherav RJD: राजदने विधानसभेला घेराव घालण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. तेजस्वी यादव यांनी या आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, प्रशासनाने कोरोनाचे कारण देत या मोर्चाला परवानगी नाकारली.

बिहार विधानसभेला घेराव घालण्यावरून राजद कार्यकर्त्यांची दगडफेक, तेजस्वी-तेजप्रताप यादव ताब्यात
बिहार विधानसभा (Bihar Assembly) अधिवेशनामध्ये लालू प्रसाद यादवांच्या राजद पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेला घेराव घालण्याची हाक दिली होती. याला पोलिसांनी परवानगी दिली नाही. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामुळे राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि तेजप्रताप यादवांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Bihar Vidhansabha Gherav RJD, Tejashwi Yadav arrested, Lathi Charge by police in Patna.)
राजदने विधानसभेला घेराव घालण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. तेजस्वी यादव यांनी या आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, प्रशासनाने कोरोनाचे कारण देत या मोर्चाला परवानगी नाकारली. यामुळे राजदच्या कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. यामध्ये एका पत्रकारासह काही लोकांना दुखापत झाली आहे.
कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा फवारा मारला. तेजस्वी यादव यांनी पुकारलेल्या मोर्चाला मोडीत काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. परवानगी नसल्याने राजदच्या युवा शाखेने कोणत्याही परिस्थितीत विधानसभेला घेराव घालणार असल्याचा इशारा दिला होता. डाकबंगला चौकात मोर्चा आल्यावर पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरु केली. धक्कादायक म्हणजे या मोर्चामध्ये तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांनी हेल्मेट घातले होते.
दगडफेकीनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर पाण्याचे जोरदार फवारे मारण्यास सुरुवात केली. तसेच तेजस्वी यादवांसह अनेक राजद नेत्यांना ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही केला.