Tauktae Cyclone: उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं काम चांगलं, तेच खरे शिवसैनिक; नितेश राणेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 12:56 IST2021-05-22T12:55:57+5:302021-05-22T12:56:28+5:30
Tauktae Cyclone: तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

Tauktae Cyclone: उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं काम चांगलं, तेच खरे शिवसैनिक; नितेश राणेंचा टोला
तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सारखं केंद्राकडे मदतीचं रडगाणं गात बसू नये. जमत नसेल तर सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्याला दौरा कसं म्हणणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री नुकसान झालेल्या भागात गेले तरी का? नुकसानग्रस्त गावकऱ्यांशी बोलले का? त्यांचे अश्रू तरी पुसले का?, मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष काय बघितलं? अशा प्रश्नांची सरबत्तीच नितेश राणे यांनी केली आहे.'टीव्ही-९' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या कामाबद्दल टीका करताना नितेश राणे यांनी यावेळी शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा दाखला दिला. "कोकणातील जनतेनं बाळासाहेबांवर खूप प्रेम केलं. पण उद्धव ठाकरेंनी त्या नात्याचा गैरफायदा घेतला. शिवसेना आणि कोकण हे नातं उद्धव ठाकरेंना कळालं असतं तर कोकणवासियांचा असा अपमान केला नसता. उलट उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे. त्यांनी किमान कोकणाला मदत तरी पाठवली. बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कसा असतो ते त्यांनी दाखवून दिलं. त्यांचे मी आभार मानेन. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडून काहीतरी शिकावं असा सल्ला मी देईल", असं नितेश राणे म्हणाले.
लिपस्टिक नव्हे, हा तर पावडर दौरा
राज्याच्या मुख्यंत्र्यांच्या कपड्याची इस्त्री देखील मोडत नाही. ते आले तसचे परत गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात असा दौरा कुणी पाहिला नसेल. मी याआधी या दौऱ्याला लिपस्टिक दौरा म्हटलं होतं. पण हा तर नुसता पावडर दौरा होता. चेहऱ्याला पावडर लावतो तसा हा दौरा होता, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.