अधिवेशनासाठी रणनीती, ममता बॅनर्जी आज दिल्लीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 07:11 IST2021-11-22T07:10:05+5:302021-11-22T07:11:18+5:30
कृषी कायदे रद्द करण्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला जाणार आहे. तीन कृषी कायदे मागील वर्षी संसदेत गदारोळामध्ये मंजूर करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधानंतर ते रद्द करण्यात आले. ते कायदे रद्द केल्याची प्रक्रिया या अधिवेशनात केली जाण्याची शक्यता आहे.

अधिवेशनासाठी रणनीती, ममता बॅनर्जी आज दिल्लीत
नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २२ ते २५ नोव्हेंबरदरम्यान दिल्लीचा दौरा करणार असून, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेण्याबरोबरच संसद अधिवेशनासाठी रणनीती तयार करणार आहेत. संसदेचे अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.
कृषी कायदे रद्द करण्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला जाणार आहे. तीन कृषी कायदे मागील वर्षी संसदेत गदारोळामध्ये मंजूर करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधानंतर ते रद्द करण्यात आले. ते कायदे रद्द केल्याची प्रक्रिया या अधिवेशनात केली जाण्याची शक्यता आहे. ममता दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटण्याची शक्यता आहे. राज्याची थकबाकी व बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढविण्यासारख्या अनेक मुद्यांवर त्या मोदींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्या विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत.
ममता बॅनर्जी यापूर्वी जुलैमध्ये दिल्लीत आल्या होत्या. एप्रिल-मेमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर त्या प्रथमच दिल्लीत आल्या होत्या. त्यावेळीही विरोधकांचे ऐक्य करण्यावर त्यांचा भर होता. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) अधिकार क्षेत्र आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ किलोमीटरहून ५० किलोमीटरपऱ्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या मुद्यावर त्यांनी यापूर्वीच आक्षेप नोंदविलेला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपल्या भावना कळविलेल्या आहेत. या दौऱ्यातही ममता हा मुद्दा उपस्थित करतील, असे सूत्रांनी सांगितले.