st Bengal Assembly Election 2021 mamata banerjee blame bjp for coronavirus case surge in west bengal | West Bengal Assembly Election 2021: "आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं मात्र भाजपामुळे संसर्ग पुन्हा वाढला"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

West Bengal Assembly Election 2021: "आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं मात्र भाजपामुळे संसर्ग पुन्हा वाढला"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीची (West Bengal Assembly Election 2021) रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आपला गड राखण्याचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपाही आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या दोन्ही बाजूनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. याच दरम्यान देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी भाजपा (BJP)वर गंभीर आरोप केला आहे. 

"आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं मात्र भाजपामुळे संसर्ग पुन्हा वाढला" असं म्हणत ममतांनी भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाने प्रचारासाठी बाहेरील राज्यांतून माणसं आणल्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असा आरोप आता ममता बॅनर्जी यांनी केला आहे. एका प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.  "लसीकरणासंदर्भातील अनेक राज्यांच्या विनंतीला केंद्र सरकार प्रतिसाद देत नाही. नागरिकांचे लसीकरण केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल."

"काही दिवसांपूर्वी आम्ही कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र, भाजपाने पश्चिम बंगालमध्ये प्रचार करण्यासाठी बाहेरील राज्यांतून माणसं बोलावली होती आणि त्यामुळे येथील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांत पश्चिम बंगालमधील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी श्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आपापसात भिडले. या हाणामारीत अनेक लोक जखमी झाले होते. गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी झाले होते.

"कूचबिहार गोळीबार पूर्वनियोजित, केंद्रातून रचला कट, अमित शहांनी राजीनामा द्यावा", ममता बॅनर्जी कडाडल्या

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपा आणि अमित शहांवर (Amit Shah) जोरदार हल्लाबोल केला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी "कूचबिहारचा गोळीबार पूर्वनियोजित होता. गृहमंत्री अमित शहांच्या निर्देशावर कट रचण्यात येतो" असा गंभीर आरोप केला होता. अमित शहांच्या राजीनाम्याची देखील त्यांनी मागणी केली. सीआयएसएफवर मतदानासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांवर गोळीबार करण्याचा आरोप केला. या घटनेचा कट केंद्रातून रचण्यात आल्याचा आरोप करताना 'अमित शहांनी या घटनेचं उत्तर द्यावं' असं ममता बॅनर्जींनी म्हटलं होतं. 
 

Web Title: st Bengal Assembly Election 2021 mamata banerjee blame bjp for coronavirus case surge in west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.