... So Kamal Nath can do miracles; Sharad Pawar claims | ...तर कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा दावा

...तर कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा दावा

मुंबई : महाराष्ट्रातील सरकार गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला कोसळणार असा दावा भाजपचे नेते करीत असले तरी राजकीय भूकंपाचा दावा करणाऱ्यांचा शिमगा आता संपलेला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी महाविकास आघाडीला धोका असल्याची शक्यता फेटाळून लावली.

राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे, ही राष्ट्रवादीची भूमिका असून कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एसआयटी चौकशीच्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला योग्य प्रकारे अर्थसहाय्य दिले जात नाही. महाराष्ट्र ज्या प्रमाणात केंद्राकडे कराची रक्कम जमा करतो त्या प्रमाणात केंद्राकडून अर्थसहाय्य मिळत नाही. निधी देण्याची जबाबदारी केंद्राला टाळता येणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

कमलनाथ चमत्कार करू शकतात
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कर्तृत्वाबद्दल मला विश्वास आहे, त्यांची क्षमता मी जाणतो.ते चमत्कार करू शकतात असे लोकांनाही वाटते, असे सांगत शरद पवार यांनी मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ बाजू पलटतील असे सूचित केले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारले असता ते म्हणाले, शिंदे यांना काँग्रेस पक्षाने संधी द्यायला हवी होती. तथापि,लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेच काही पद देण्याची पद्धत त्या पक्षात नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाला दोष देता येणार नाही. काँग्रेसकडे नेतृत्व आणि कर्तृत्वही आहे आणि त्या पक्षाचे भविष्य ऊज्ज्वल आहे.

Web Title: ... So Kamal Nath can do miracles; Sharad Pawar claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.