Shiv Sena still has majority BJP Candidate win in Bhiwandi Panchayat Samiti chairperson post | शिवसेनेकडे संख्याबळ तरीही 'या' पंचायत समिती सभापतीपदावर भाजपाचा झेंडा; शिवसैनिक नाराज

शिवसेनेकडे संख्याबळ तरीही 'या' पंचायत समिती सभापतीपदावर भाजपाचा झेंडा; शिवसैनिक नाराज

ठळक मुद्देभिवंडी पंचायत समितीच्या भाजपच्या सभापती संध्या नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदी बिनविरोध निवडभाजपा व सेनेने युतीच्या माध्यमातून सभापती व उपसभापती पद अवघे तीन तीन महिन्यांकरीता वाटून घेतलेशिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक असूनही पंचायत समितीच्या सभापदी पदी भाजपच्या ललिता पाटील बिनविरोध निवडून आल्या आहेत

नितिन पंडीत 

भिवंडी -  भिवंडी पंचायत समितीच्या सभापती भाजपच्या ललिता प्रताप पाटील यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीने पंचायत समितीवर पुन्हा एकदा भाजप राज स्थापित झालं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेसह महाआघाडीकडे संख्याबळ असतानाही शिवसेनेचे तालुक्यातील नेते भाजपच्या हाती पंचायत समिती का देतात असा सवाल सामान्य शिवसैनिकांना पडला असून सेनेच्या वरिष्ठांच्या या राजकीय रणनीतीमुळे तालुक्यातील सामान्य शिवसैनिक कमालीचे नाराज झाले आहेत.

भिवंडी पंचायत समितीच्या भाजपच्या सभापती संध्या नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदी शुक्रवारी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात सभापती निवडणूक पार पाडली या निवडणुकीत भाजपच्या ललिता पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी तहसीलदार अधिक पाटील यांनी ललिता पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली आहे. 

भाजपाच्या कुरघोडी राजकारणाला वैतागून शिवसेनेने राज्यात महाआघाडी सोबत घरोबा करून भाजपाला सत्तेपासून दूर केले आहे. मात्र भिवंडी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी युती केल्याचे शुक्रवारी पुन्हा समोर आले आहे. भाजपा व सेनेने युतीच्या माध्यमातून सभापती व उपसभापती पद अवघे तीन तीन महिन्यांकरीता वाटून घेतले असल्याचे समजत असून त्यानुसार भाजपाच्याच सभापती संध्या नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या ललिता पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी मावळत्या सभापती संध्या नाईक ,उपसभापती सबिया इरफान भुरे, भाजपा तालुकाध्यक्ष पी के म्हात्रे ,शिवसेना तालुका प्रमुख विश्वास थळे, भाजपा गटनेता भानुदास पाटील, शिवसेना गटनेता रविकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्या सपना भोईर ,राहनाळ सरपंच राजेंद्र मढवी, भाजपा पदाधिकारी राजेंद्र भोईर ,प्रताप पाटील,जितेंद्र डाकी यांसह सेना भाजपचे असंख्य पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित सभापती ललिता पाटील यांना शुभेच्छा दिल्या.  

भिवंडी पंचायत समितीत शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक असूनही पंचायत समितीच्या सभापदी पदी भाजपच्या ललिता पाटील बिनविरोध निवडून आल्या आहेत. सुरुवातीला भिवंडी पंचायत समितीत सभापती निवडणुकीत काँग्रेसच्या दोन सदस्यांनी भाजपला साथ दिल्याने सभापती निवडणुकीत सम समान मते पडल्याने चिठ्ठी उडवून सभापती घोषित करण्यात आले होते त्यावेळी भाजपची चिठ्ठी उघडल्याने सभापती पदी भाजपच्या रविना रवींद्र जाधव या सभापती झाल्या होत्या. त्यानंतर राज्यात सेना भाजपामध्ये काडीमोड झाल्यानंतर काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी सावध पवित्रा घेतल्याने अडीच वर्षानंतर भिवंडी पंचायत समितीवर सेनेचा भगवा फडकला. यावेळी सेनेचे विकास भोईर हे सभापती म्हणून विराजमान झाले होते. त्यानंतर तालुक्यातील सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने ठरल्याप्रमाणे विकस भोईर यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला त्यानंतर पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपच्या संध्या नाईक विराजमान झाल्या होत्या. शिवसेनेकडे संख्याबळ असूनही व राज्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेतल्यानंतरही सेनेच्या वरिष्ठांनी पंचायत समितीची सूत्रे भाजपाकडे दिल्याने त्यावेळी शिवसैनिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. शिवसेनेच्या वरिष्ठांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली होती मात्र आता पुन्हा सभापती पदाची माळ भाजपच्या गळ्यात घातल्याने शिवसेना कार्यकर्ते पुन्हा नाराज झाले असून शनिवारी शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी होत असतांना त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच सेनेच्या नेत्यांनी पंचायत समितीची सूत्रे भाजपच्या हाती देत स्व. बाळासाहेबांना अनोखी आदरांजली वाहिली की काय अशी उपहासात्मक टिका व चर्चा शिवसैनिकांमध्ये रंगली असून सोशल मीडियावर देखील सेनेच्या वरिष्ठांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

भिवंडी पंचायत समितीत एकूण  ४२ सदस्य शिवसेना २० , भाजपा १९ ,काँग्रेस २ ,मनसे १ असे पक्षीय बलाबल आहे. विशेष म्हणजे राज्यात महाघाडी सत्ता स्थापन होण्याआधीच भिवंडी पंचायत समितीत भाजपविरोधात स्थानिक नेत्यांनी एकत्र येत महायुती स्थापन करून शिवसेना , काँग्रेस व मनसे यांनी एकत्र येत पंचायत समितीवर एकहाती सत्ता आणण्याचा प्रयत्न केला आहे. पंचायत समितीत महाआघाडीचे एकूण २३ सदस्य असतांनाही अवघ्या १९ सदस्य असलेल्या भाजपच्या गळ्यात सेना पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा सभापती पदाची बिनविरोध माळ का घातली ? असा प्रश्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

Web Title: Shiv Sena still has majority BJP Candidate win in Bhiwandi Panchayat Samiti chairperson post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.