shiv sena slams bjp over hindutva by giving reference of rss chief mohan bhagwats speech | सरसंघचालक 'तसं' कधीच सांगणार नाहीत; शिवसेनेचा भाजपवर पुन्हा बाण

सरसंघचालक 'तसं' कधीच सांगणार नाहीत; शिवसेनेचा भाजपवर पुन्हा बाण

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्यातील भाषणावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेनेनं सामनामधून प्रत्युत्तर दिलं आहे. सरसंघचालक व शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे हिंदुत्वाला व राष्ट्रीय ऐक्याला दिशा देणारीच होती. हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही, अशा शब्दांमध्ये सामनामधून भाजपवर शरसंधान साधण्यात आलं आहे. राज्यातील मंदिरं सुरू करण्यावरून भाजप वारंवार शिवसेनेला लक्ष्य करत आहे. त्यावरून 'कोरोना' महामारीची पर्वा न करता सर्व मंदिरं खुली करा, असं सरसंघचालक मोहन भागवत कधीच सांगणार नाहीत, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 

सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही, रामदास आठवलेंचा टोला

मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बोलतोय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कंगना राणौतवरही उद्धव ठाकरे जोरदार बरसले. यानंतर काल दिवसभर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली. शिवसेनेनं हिंदुत्व गुंडाळून ठेवलं, सावरकरांबद्दल मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द काढला नाही, अशी टीका भाजप नेत्यांनी केली. त्या टीकेचा शिवसेनेनं सामनामधून समाचार घेतला आहे.

ठाकरे स्वत:च्या सोयीने हिंदुत्व वापरतात, चंद्रकांत पाटील यांचा टोला 

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे-
- सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करून सांगितली आहे. संघाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्वाचा अर्थ व्यापक असून पूजा पद्धतीशी जोडून त्याला संकुचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदुत्व हे देशाच्या स्वत्वाचे सार असल्याची भूमिका श्री. भागवत यांनी मांडली. हिंदुत्व ही जणू आपलीच मक्तेदारी, जे भाजपबरोबर नाहीत ते हिंदू नाहीत अशा विकृत विचारसरणीपर्यंत काही ठेकेदार पोहोचले असतानाच सरसंघचालकांनी त्या ठेकेदारांचे दात नागपुरात घशात घातले आहेत. 

"उद्धव ठाकरेंमध्ये नाव घ्यायची हिंमत नाही, कारण त्यांना माहितीय की..."

- महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान भगतसिंग कोश्यारी यांनी संघाची काळी टोपी घालून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचे धडे देण्याचा प्रयत्न करून पाहिला. महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार की नाही? तुम्ही हिंदुत्व सोडले आहे काय? तुम्ही सेक्युलर झालात काय? असे प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यास उद्धव ठाकरे यांनी खणखणीत उत्तर दिलेच, पण आता सरसंघचालकांनीही यावर खडे बोल सुनावले आहेत. 

"उद्धव ठाकरेंचं भाषण वाया गेलेल्या मुलाच्या चिडलेल्या बापाच्या भाषणासारखं होतं"

- शिवतीर्थावरील मेळाव्यात (वीर सावरकर स्मारकाच्या सभागृहातील) मुख्यमंत्र्यांनी भाजपातील हिंदुत्वाच्या राजकीय ठेकेदारांना सुनावले आहे की, हिंदुत्व म्हणजे काय ते सरसंघचालकांकडून शिका. यावर पुढे जाऊन श्री. ठाकरे यांनी खडसावले आहे की, घंटा बडवणं, थाळ्या पिटणं हे आमचं हिंदुत्व नाही. त्याने काही होत नाही. मुंबईला पाकव्याप्त कश्मीरची उपमा देणाऱ्या नटीचा आदरसत्कार करणे हे काही आमच्या हिंदुत्वात बसत नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मारलेला हा टोला राजभवनाला अस्वस्थ करणारा आहे. 

- भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व गोमातेच्या भोवती फिरते आहे व त्यातून देशात मोठा खूनखराबा झाला. वीर सावरकरांचे गाईबाबतचे मत वेगळे होते. गाईला ते हिंदुत्वाचे प्रतीक मानायला तयार नव्हते. गाय हा एक उपयुक्त पशू पिंवा प्राणी आहे एवढेच त्यांचे मत, पण भाजपातील हिंदुत्ववाद्यांनी गाईवरून हिंदू-मुसलमानांत दंगली भडकवल्या व राजकारण केले. 'माय मरो आणि गाय जगो' हे आमचे हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता? हेच का तुमचे हिंदुत्व? असा टोकदार भालाच उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुपसला आहे. भाजपशासित अनेक राज्यांत गाई कापल्या जातात व खाल्ल्या जातात हे वास्तव आहे. त्यामुळे भाजपचे गाईचे हिंदुत्व तकलादू आहे व श्री. ठाकरे यांनी त्या तकलादू भूमिकेची चिरफाड करत लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. त्यामुळे सरसंघचालक काय सांगतात ते अनेकदा दिशादर्शक ठरते. संघाचा हिंदू विचार कधीच लपून राहिला नाही. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाले, त्या सोहळ्यास सरसंघचालक मोहन भागवत विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. अयोध्येत राममंदिर व्हावे ही संघाची भूमिका होतीच, पण 'कोरोना' महामारीची पर्वा न करता सर्व मंदिरे खुली करा, असे श्री. भागवत कधीच सांगणार नाहीत. मंदिरांत गर्दी झाली तर महामारीचे संकट वाढेल असा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणाऱ्यांपैकी सरसंघचालक आहेत. घंटा बडवून, थाळ्या वाजवून कोरोना पळून जाणार नाही. त्यासाठी आरोग्यविषयक कठोर नियम-शिस्तीचे पालन करावेच लागेल, लसीवर संशोधन करावेच लागेल असे मानणारे सरसंघचालक आहेत. 

- भारतीय जनता पक्षाचे जे लोक मंदिरासाठी थाळ्या बडवत आहेत व छाती पिटत आहेत त्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्वाचे धडे घ्यायला हवेत. ''आमच्यासाठी 'हिंदुत्व' हा शब्द आपल्या प्रथापरंपरांवर आधारित मूल्य पद्धतीचा आहे. त्यामुळेच या व्याख्येत 130 कोटी भारतीय येतात. आम्ही व्यापक अर्थाने हिंदुत्वाकडे पाहतो'' हे श्री. भागवतांचे विधान आजच्या स्थितीत महत्त्वाचे आहे. 

- उत्तर प्रदेशात परवानगीशिवाय दाढी ठेवली या कारणाखाली एका पोलीस फौजदाराला सरकारने निलंबित केले. त्याचे तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी स्वागत केले, पण राजकारणात, केंद्रीय मंत्रिमंडळात अनेकांनी दाढी अभिमानाने ठेवलीच आहे. हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही. चापेकर बंधूंना दाढी नव्हतीच, पण तीनही चापेकर बंधू हसत हसत देशासाठी फासावर गेले. अशा मर्दानगीची अनेक उदाहरणे आहेत.

Web Title: shiv sena slams bjp over hindutva by giving reference of rss chief mohan bhagwats speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.