Thackeray uses Hindutva for his own convenience, says Chandrakant Patil | ठाकरे स्वत:च्या सोयीने हिंदुत्व वापरतात, चंद्रकांत पाटील यांचा टोला 

ठाकरे स्वत:च्या सोयीने हिंदुत्व वापरतात, चंद्रकांत पाटील यांचा टोला 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत:च्या सोईने हिंदुत्व वापरतात. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी हिंदुत्वाची व्याख्याच बदलल्याचे दिसते, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे  यांच्या भाषणावर दिली.

ते म्हणाले की, ठाकरे हे बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणे विसरले आहेत.  सरसंघचालकांनी कालच्या भाषणात एक वक्तव्य केलं, ‘’’’हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है’’’’, हे मुळात तुमच्यासाठी होतं. हिंदुत्वाचा वापर करून आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी तुमचा हा सगळा आटापिटा सुरु आहे. तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही कारण तुमचं हिंदुत्व हे सोयीप्रमाणे बदलते असे पाटील हे ठाकरेंना उद्देशून म्हणाले. कोरोनाबाबत भाषणात चिडीचूप बसलात, शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलला नाहीत. केवळ भाषणबाजी करून काहीही होणार नाही, असे पाटील म्हणाले. 

अभिनेता सुशांतसिंहची हत्याच; आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल 
 अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नव्हती, ती हत्याच होती आणि या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी सोमवारी पत्र परिषदेत केला. ‘उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपविरुद्ध बोलले. यापुढे ते तसे बोलले तर मातोश्रीवरील आतलेबाहेरचे सगळेच बाहेर काढू’ असा इशाराही राणे यांनी दिला. 

मुख्यमंत्री ठाकरे यांचा पूर्णवेळ एकेरीत उल्लेख करत राणे पत्रपरिषदेत म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआय करीत आहेच. आज जे मी बोलतोय ते सीबीआय पाहतच असेल त्यांनी बोलावले तर मी, माझी मुले त्या बाबतची माहिती देऊ. स्वत:च्या मुलाला क्लीन चिट देण्याचा ठाकरेंना काय अधिकार? पोलिसांचा वापर करून ते मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

३९ वर्षे मी शिवसेनेत होतो, मला खूप काही माहिती आहे. उद्या बोललो ना तर पळता भुई थोडी होईल. आमच्याकडे नजर फिरवू नका. कालच्या भाषणात बेडूक वगैरे बोललात, बेडूक तरी एका दिशेने जाते. तुम्ही हिंदुत्वाला मूठमाती देत सेक्युलर होणारे आणि पुन्हा हिंदुत्व सोडले नसल्याचे सांगणारे दोन तोंडी गांडूळ आहात, असा हल्लाबोलही राणे यांनी केला. उद्धव हे मराठा समाजाचा द्वेष करणारे आहेत, ते या समाजाला कधीही आरक्षण देणार नाहीत, असेही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुखांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव यांनी बाळासाहेबांना छळलं. दादरमधील शिवसेना भवनचे उद्घाटन दसऱ्याला करून त्याच ठिकाणी गडकरी चौकात दसरा मेळावा घ्यावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती, ती डावलून त्यांनी शिवाजी पार्कवरच मेळावा घेतला, तेव्हा बाळासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले होते? असा दावाही राणे यांनी केला. ‘पुढची २५ वर्षे शिवसेना सत्तेत राहील’, असे म्हणताना संजय राऊत कोणत्या धुंदीत होते? असा सवाल राणे यांनी केला.

Web Title: Thackeray uses Hindutva for his own convenience, says Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.