Uddhav Thackeray doesn't even know when the government will fall, says Ramdas Athavale | सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही, रामदास आठवलेंचा टोला

सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही, रामदास आठवलेंचा टोला

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच २५-३० वर्षे शिवसेना आणि भाजपची युती होती. मग, आता अचानक शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे कसे बनले, असा प्रश्न उपस्थित करतानाच राज्यातील महाविकास आघाडी  सरकार आम्ही पाडणार नाही. पण, हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकार पडले तर अराजकता पसरेल असे विधान केले आहे. मात्र, या विधानाशी मी सहमत नाही. सरकार स्वतःच पडेल आणि वेगळाच इतिहास घडेल, महाविकास आघाडी पराभूत ठरेल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे एक दिवस भूकंप होईल, असे आठवले म्हणाले.

मुंबई पाकव्याप्त काश्मीरच्या कंगनाच्या भूमिकेचा आम्ही विरोधच केला. परंतु, मुंबईत तिला येऊ देणार नाही या घटनाविरोधी भूमिकेला विरोध दर्शवत त्याबाबत कंगनाला पाठिंबा दिला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर कंगना त्यांना भेटली असती तर ताबडतोब हा विषय मिटला असता. त्यामुळे कंगनाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन विषय संपवावा, असे आवाहनही आठवले यांनी केले. जीएसटी कायदा रद्द करण्याची गरज नाही. यात नवीन काही करण्याची गरज नाही. जीएसटी पैसा मिळाला पाहिजे या मताशी सहमत असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
 

Web Title: Uddhav Thackeray doesn't even know when the government will fall, says Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.