“चर्चा होऊ शकते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय स्पष्ट झालाय”; शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम

By प्रविण मरगळे | Published: January 18, 2021 11:16 AM2021-01-18T11:16:39+5:302021-01-18T11:19:54+5:30

तर मतांचे राजकारण नाही, हा चांगला आणि वाईट असा विषय आहे, मतांचा नाही

Shiv Sena Sanjay Raut Target Congress Balasaheb Thorat over Aurangabad Rename Sambhaji Nagar Issue | “चर्चा होऊ शकते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय स्पष्ट झालाय”; शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम

“चर्चा होऊ शकते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय स्पष्ट झालाय”; शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम

googlenewsNext
ठळक मुद्दे औरंगजेब, बाबर ही आमची प्रतिकं होऊ शकत नाही. विरोध करणाऱ्यांनी आधी औरंगजेब समजून घेतला पाहिजेमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरचा निर्णय स्पष्ट केला आहे, हा लोकांच्या भावनेचा विषय आहेऔरंगजेबाच्या प्रेमात कोणीही पडू नये, महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरच प्रेम करावं असं मला वाटतं

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगाबाद नामांतरणावरून वाद पेटला आहे. यातच महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारत भाजपा आणि शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत? अशा शब्दात काँग्रेसनं शिवसेनेला सुनावलं. तर दुसरीकडे शिवसेनेने काँग्रेसच्या आक्षेपाला दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे.

याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, औरंगजेबाच्या प्रेमात कोणीही पडू नये, महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरच प्रेम करावं असं मला वाटतं, औरंगजेब हा क्रूर शासक होता, तो धर्मांध होता, त्याला परधर्माबद्दल अजिबात प्रेम नव्हतं, अशा राजाच्या नावासाठी राज्यात आणि देशात कोणीही आग्रही असू नये, संभाजीनगर हे नाव शिवसेनेने दिलेले आहे, त्यावर कोणी आक्षेप घेऊ नये, औरंगजेबाने हिंदूंची धर्मांतर, छळ केला ही माहिती औरंगजेबावर प्रेम करणाऱ्यांनी मिळावी यासाठी लेख लिहिला होता असं त्यांनी सांगितले.

तर मतांचे राजकारण नाही, हा चांगला आणि वाईट असा विषय आहे, मतांचा नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक असले तरी त्यांच्या इतका सेक्युलर राजा दुसरा कोणीही झाला नाही. औरंगजेब, बाबर ही आमची प्रतिकं होऊ शकत नाही. विरोध करणाऱ्यांनी आधी औरंगजेब समजून घेतला पाहिजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरचा निर्णय स्पष्ट केला आहे, हा लोकांच्या भावनेचा विषय आहे, यावर चर्चा होईल परंतु निर्णय झालेला आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे दम दिला आहे.

काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात?

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहेत. काँग्रेसने आपली भूमिका याआधीच स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, मागील ५ वर्ष एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाहीतर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा आठवला नाही का?" राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा 'सामना' सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाले तर ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून पाहते असा टोला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी पत्रक काढून भाजपा-शिवसेनेला लगावला आहे.

त्याचसोबत "राज्यातील सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनविले आहे. हे सरकार बनविताना आम्ही सर्वांनी एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही असंही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Shiv Sena Sanjay Raut Target Congress Balasaheb Thorat over Aurangabad Rename Sambhaji Nagar Issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.