shiv sena mp arvind sawant will take oath as central minister tomorrow | शिवसेनेचं ठरलं! कॅबिनेट मंत्रिपदी अरविंद सावंत शपथ घेणार
शिवसेनेचं ठरलं! कॅबिनेट मंत्रिपदी अरविंद सावंत शपथ घेणार

- मनोहर कुंभेजकर

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सायंकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे. काल सुमारे 5 तास आणि आज सुमारे 4 तास मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात केंद्रातील मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली. उद्या पंतप्रधानांसह महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होईल. यामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार आणि शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांच्या नावाचा समावेश आहे.

अरविंद सावंत यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबई मतदारसंघात पराभूत केलं. गेल्या निवडणुकीतही त्यांनी देवरांचा पराभव केला होता. अरविंद सावंत यांनी गेल्या टर्ममध्ये एक अभासू खासदार म्हणून ठसा उमटवला होता. त्यांची संसदेतील भाषणेदेखील गाजली होती. विशेष म्हणजे अरविंद सावंत हे मातोश्रीच्या जवळचे समजले जातात.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन कॅबिनेट, दोन राज्यमंत्री, एक उपसभापती व एक राज्यपालपद अशी मागणी मोदी व शाह यांच्याकडे केल्याचे समजते. जूनच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाटेला अजून एक कॅबिनेट मंत्रीपद आल्यास शिवसेनेतील जेष्ठ नेते व उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील खासदार गजानन कीर्तिकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या दोन राज्यमंत्री पदासाठी शिवसेनेतील एकमेव महिला खासदार असलेल्या यवतमाळच्या भावना गवळी, बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांची नावे आघाडीवर आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, कोकणात शिवसेना मजबूत करून नारायण राणे यांना शह देण्यासाठी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते.
 


Web Title: shiv sena mp arvind sawant will take oath as central minister tomorrow
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.