शरद पवारांवरील टीकेचा शिवसेनेकडून समाचार; पडळकरांचा 'खास' शब्दात उल्लेख

By कुणाल गवाणकर | Published: November 23, 2020 05:11 PM2020-11-23T17:11:10+5:302020-11-23T17:11:57+5:30

गोपीनाथ पडळकर यांच्यावर शिवसेना नेते अनिल परब यांची जोरदार टीका

Shiv Sena leader anil parab slams bjp mla gopichand padalkar for criticizing ncp chief sharad pawar | शरद पवारांवरील टीकेचा शिवसेनेकडून समाचार; पडळकरांचा 'खास' शब्दात उल्लेख

शरद पवारांवरील टीकेचा शिवसेनेकडून समाचार; पडळकरांचा 'खास' शब्दात उल्लेख

Next

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी पवारांवर शरसंधान साधलं आहे. ज्या पक्षाचे ४ खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता. मग ३०३ खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल त्यांनी विचारला आहे. पडळकर यांच्या विधानाचा शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी समाचार घेतला आहे.

आपण कोणावर टीका करतोय याचा अभ्यास चंद्रकांत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी करायला हवा. त्यांनी शरद पवारांचं कर्तृत्व पाहायला हवं. वयाच्या ३६ व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले. गेल्या ५० वर्षांपासून ते संसदीय राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे टीकाकारांनी एकदा स्वत:ला पवारांसमोर तपासून पाहायला हवं, असं परब म्हणाले. पडळकर यांच्यावर भाजपचे संस्कार नाहीत. भाजपमधील व्यक्ती अशी बोलणार नाहीत. हा भाजपमधील 'भेसळी'चा परिणाम आहे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

वर्षभरापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच शपथविधी उरकला होता. यावर भाष्य करताना पुढील शपथविधी पहाटेला नव्हे तर योग्य वेळी होईल, असं म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा अनिल परब यांनी समाचार घेतला. 'सत्ता नसल्यानं देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. पुढील किमान ५ वर्षे तरी त्यांना सत्तेची स्वप्नं पाहतच काढावी लागणार आहेत. सत्ता नसल्यास पक्षात आलेले नेते सोडून जातील, अशी भीती असल्यानं सत्ता येईल अशी विधानं करावी लागतात,' असा चिमटा परब यांनी काढला. 

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आवश्यक पावलं उचलली जात आहेत. पुन्हा लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार नाही. सरकार लॉकडाऊन करण्याच्या मताचं आहे. कोरोनाची दुसरी लाट आलीच, तर संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. कोरोनाची परिस्थिती कशी सांभाळायची याचा अनुभव आता प्रशासनाच्या गाठिशी आहे, असं परब म्हणाले.
 

Web Title: Shiv Sena leader anil parab slams bjp mla gopichand padalkar for criticizing ncp chief sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.