Shiv Sena has nine, while BJP has four ward committee chairs; The remaining four wards will be today | महापालिकेच्या प्रभाग समितींमध्ये शिवसेनाच वरचढ; काँग्रेसची साथ मिळाल्याने पारडं झालं जड

महापालिकेच्या प्रभाग समितींमध्ये शिवसेनाच वरचढ; काँग्रेसची साथ मिळाल्याने पारडं झालं जड

मुंबई : पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने तीन तर भाजपने दोन समित्यांवर वर्चस्व मिळवले. आतापर्यंत १३ प्रभाग समित्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला नऊ तर भाजपला चार प्रभागांचे अध्यक्षपद मिळवता आले आहे. तर उर्वरित चार प्रभागांमध्ये शुक्रवारी शिवसेना-भाजपमध्ये लढत रंगणार आहे.

महापालिकेत शिवसेनेनंतर सर्वाधिक संख्याबळ असलेला भाजप हा दुसरा मोठा पक्ष आहे. त्यामुळे प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी या विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या बाजूने कौल दिल्यामुळे त्यांचे पारडे जड झाले. तरीही आतापर्यंत तीन प्रभागांमध्ये संख्याबळ अधिक असल्याने भाजप उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तर गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत के-पश्चिम प्रभागात भाजपने शिवसेनेला मात दिली.

‘‌के/पूर्व’ प्रभागात शिवसेनेच्या प्रियांका सावंत यांनी तीन मताधिक्याने भाजपचे अभिजित सामंत यांचा पराभव केला. तर, ‘के/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सुधा सिंग यांनी शिवसेनेचे राजू पेडणेकर यांचा अवघ्या एका मताधिक्याने पराभव केला. पी/दक्षिण प्रभागात भाजपचे हर्ष पटेल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. ‘पी/उत्तर’ प्रभागात शिवसेनेच्या संगीता सुतार यांनी भाजपच्या दक्षा पटेल यांचा पराभव केला. ‘एल’ प्रभागात शिवसेनेच्या आकांक्षा शेट्ये यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

पी उत्तर, के पूर्व, एच पूर्व/ एच पश्चिम, एफ उत्तर/ एफ दक्षिण, ए/बी/ई, जी दक्षिण, जी उत्तर, एम पूर्व, एल या प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. पी दक्षिण, के पश्चिम, सी/डी, एम पश्चिम या प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे आहे.

 

 

Web Title: Shiv Sena has nine, while BJP has four ward committee chairs; The remaining four wards will be today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.