शिवसेना म्हणजे नाटक कंपनी; औरंगाबादच्या नामांतरावरून देवेंद्र फडणवीसांचा टीकेचा बाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 19:11 IST2021-01-05T18:45:41+5:302021-01-05T19:11:17+5:30
औरंगाबादच्या नामांतरावरून फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात

शिवसेना म्हणजे नाटक कंपनी; औरंगाबादच्या नामांतरावरून देवेंद्र फडणवीसांचा टीकेचा बाण
मुंबई: शिवसेना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत आहे. मुंबई महापालिका निवडणूक आल्यानं त्यांना गुजराती समाजाची आठवण झाली आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आल्यानं त्यांना संभाजी महाराजांची आठवण होऊ लागली आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिवसेनेचा उल्लेख नाटक कंपनी असा केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
औरंगाबादच्या नामांतराचा विषय म्हणजे शिवसेनेचं नाटक आहे. सेना फक्त प्रस्ताव पाठवते, भूमिका घेत नाही. ही सगळी नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सर्व गोष्टी ठरवून करत आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली. औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना, काँग्रेसचं राजकारण सुरू असल्याचं ते म्हणाले. 'शिवसेनेनं आता औरंगाबादचं संभाजी नगर करा, असं म्हणायचं. म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खूश होतील. काँग्रेसनं ते करू नका अशी भूमिका घ्यायची. म्हणजे त्यांना वाटतं, त्यांचे मतदार खूश होती. निवडणुका आल्यामुळे ही नुराकुस्ती सुरू झाली आहे. दोन्ही पक्ष निव्वळ नाटक करत आहेत,' असा टोला फडणवीस यांनी लगावला.
मी मुख्यमंत्री असताना औरंगाबादमधील रस्त्याच्या कामासाठी पैसे दिले. पण महानगरपालिकेनं ते पैसे वेळेत खर्च केले नाहीत. मी १०० कोटी देतो असं सांगितलं होतं. पण त्यांना आधीचेच पैसे खर्च करता आले नाहीत. औरंगाबादमध्ये इतकी वर्षं सत्ता असूनही कुठलंही महत्त्वाचं काम न करता आल्यानं आता नामांतराची भाषा सुरू झाली आहे. शिवसेनेकडून केवळ पत्रं पाठवली जातात. बाकी कुठलीही कार्यवाही ते करत नाहीत. केवळ निवडणुका आल्यानंतर त्यांना या गोष्टी का आठवतात, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.