Shiv Sena defeated NCP's indicator in elections | नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा सूचक शिवसनेने पळविला

नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा सूचक शिवसनेने पळविला

ठळक मुद्देया प्रकरणी सूचक रवींद्र महाकाळकर यांनी शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल केली आहे.इकडे दोन उमेदवाराला एकच सूचक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द ठरविण्यात आला.

कन्हान - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाच वर्ष एकसंघ राहण्याचा संकल्प केला आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील कन्हान नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसनेने राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा सूचक पळविल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात निवडणुकीच्या काळात उमेदवारांची पळापळवी नवी नाही. कन्हान नगपरिषदेच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा सूचक प्रतिस्पर्धी शिवसेनेने पळविल्याची राजकीय चर्चा जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे. इकडे दोन उमेदवाराला एकच सूचक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द ठरविण्यात आला. या प्रकरणी सूचक रवींद्र महाकाळकर यांनी शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हान न.प.च्या प्रभाग चारसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणारे सुर्यकांत फरकाडे यांच्या उमेदवारी अर्जावर गुरुवारी सूचक म्हणून रवींद्र महाकळकर यांनी कागदपत्रे जोडून स्वाक्षरी केली होती. फरकाडे यांनी शुक्रवारी निवडणूक अधिकारी वंदना सवरंगपते यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. याच प्रभागातून शिवसेनेकडून महिला उमेदवार नंदा सुभाष घोगले यांनीही रवींद्र महाकाळकर यांची सूचक म्हणून स्वाक्षरीसह कागदपत्रे जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला. शनिवारी उमेदवार अर्जांची छाणनी झाली. यात फरकाडे व घोगले या दोन उमेदवारांचा सूचक रवींद्र महाकाळकर हा एकच असल्याने घोळ झाला. सर्वप्रथम नंदा घोगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक अधिकाºयांनी नियमांचा आधार घेत फरकाडे यांचा अर्ज बाद केला. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडे महाकाळकर यांनी आपण फरकाडे यांचा सूचक असल्याचे स्पष्टीकरण दिले. फरकाडे यांच्या अर्जावरील स्वाक्षरी आपलीच असल्याची कबुली महाकाळकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. घोगले यांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे घेत खोटी स्वाक्षरी मारल्याचा आरोप केला. यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना अपिलात जाण्याची सूचना केली. यावरून नंदा घोगले यांच्याविरुद्ध कन्हान पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी महाकाळकर यांनी लेखी तक्रार केली आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांना विचारणा केली असता उमेदवारी अर्जाचा वाद असल्याने संबंधित अधिकारीच यावर योग्य निर्णय घेतील असे सांगितले.

Web Title: Shiv Sena defeated NCP's indicator in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.