शिवसेना-भाजपा कार्यकर्ते भिडले, तिथेच शिवसैनिक-मनसैनिकांमध्ये झाला होता 'राडा'...अजूनही जखमा ताज्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 04:33 PM2021-06-17T16:33:15+5:302021-06-17T16:36:21+5:30

मुंबईच्या राजकीय इतिहासात रस्त्यावरील संघर्षाची ही घटना काही नवीन नाही. याआधीही अनेकदा शिवसेना-मनसे यांचा रस्त्यावरील संघर्ष पाहायला मिळाला आहे.

Shiv Sena-BJP workers clashed on Ram mandir issue, Remember Shivsena and MNS Rada at Dadar | शिवसेना-भाजपा कार्यकर्ते भिडले, तिथेच शिवसैनिक-मनसैनिकांमध्ये झाला होता 'राडा'...अजूनही जखमा ताज्या

शिवसेना-भाजपा कार्यकर्ते भिडले, तिथेच शिवसैनिक-मनसैनिकांमध्ये झाला होता 'राडा'...अजूनही जखमा ताज्या

Next
ठळक मुद्देबुधवारी ज्या शिवसेना भवनासमोर भाजपा कार्यकर्ते आणि शिवसैनिक भिडले होते. त्याचठिकाणी काही वर्षापूर्वी मनसे-शिवसेनेत राडा झाला होता.शिवसेनेतील बहुसंख्य शिवसैनिक राज ठाकरेंच्या पाठिशी आले, त्यामुळे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक बनलेएकमेकांवर दगडफेक, काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या होत्या. यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी फुटली होती

मुंबई – राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनासमोरच भाजपा-सेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. राम मंदिराच्या जमीन खरेदीच्या कथित आरोपावरून भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. परंतु याची आधीच कल्पना मिळताच शिवसेना भवनासमोर आमदार सदा सरवणकर यांच्यासह अनेक शिवसैनिक आधीच उपस्थित होते. पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांचा मोर्चा अडवला. परंतु त्यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

मुंबईच्या राजकीय इतिहासात रस्त्यावरील संघर्षाची ही घटना काही नवीन नाही. याआधीही अनेकदा शिवसेना-मनसे यांचा रस्त्यावरील संघर्ष पाहायला मिळाला आहे. बुधवारी ज्या शिवसेना भवनासमोर भाजपा कार्यकर्ते आणि शिवसैनिक भिडले होते. त्याचठिकाणी काही वर्षापूर्वी मनसे-शिवसेनेत राडा झाला होता. बुधवारच्या घटनेकडे मनसे कार्यकर्ते तटस्थ भूमिकेत दिसत आहेत. परंतु यानिमित्ताने मनसे-शिवसेना यांच्यातील संघर्षाची आठवण झाली.

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मनसेची स्थापना केली, यानंतर शिवसेनेतील बहुसंख्य शिवसैनिक राज ठाकरेंच्या पाठिशी आले, त्यामुळे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक बनले, राज ठाकरेंप्रमाणे मनसेचे कार्यकर्तेही आक्रमक आहेत, त्यामुळे अनेकदा शिवसैनिक-महाराष्ट्र सैनिक यांच्यातील राडा रस्त्यांवर पाहायला मिळाला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान या दोन्ही पक्षातील संघर्ष विकोपाला गेला होता, ओल्ड कस्टम हाऊस येथे सेना-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. याठिकाणी एकमेकांच्या पक्षाचे बॅनर्स फाडण्यात आले, इतकचं नव्हे तर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती.

शिवसेना भवनासमोरच भाजपा-सेना कार्यकर्ते भिडले; दादरमध्ये तणाव, पोलीस बंदोबस्त वाढवला

शिवसेना-मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले होते, एकमेकांवर दगडफेक, काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या होत्या. यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी फुटली होती. शिवसेना-मनसे यांच्यातील हा संघर्ष अतिशय तीव्र स्वरुपाचा होता. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यानंतर मानुखर्द महाराष्ट नगर येथे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून निवडणुकीत पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत मनसे-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले होते, यावेळीही कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. यात काही पोलीसही जखमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

२०१८ मध्ये लोअर परेल येथील पूलाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती, तत्कालीन आमदार सुनील शिंदे आणि मनसे पदाधिकारी संतोष धुरी यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते त्यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. बुधवारच्या भाजपा-शिवसेना यांच्यातील संघर्षानंतर मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यातील वादाचीही जोरदार चर्चा होत आहे.

Web Title: Shiv Sena-BJP workers clashed on Ram mandir issue, Remember Shivsena and MNS Rada at Dadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app