मुंबई - राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीमधील ज्येष्ठ नेते सरकारमध्ये सारे काही आलबेल असल्याचा तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा दावा वारंवार करण्यात येत असतो. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेत्यांमध्ये वारंवार मतभेद होताना दिसत आहेत. आता यामधील नवा अध्याय राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) काही वरिष्ठ नेत्यांमधील संघर्षाने सुरू झाला आहे. शिवसेनेचे काही मंत्री आणि आमदारांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीविरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. (senior Shiv Sena leaders opened a front against Jitendra Awhad and lodged a complaint with the Chief Minister)
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी आमदार विनोद घोसाळकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सुनील प्रभू या शिवसेना नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीविरोधात मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत तक्रार केली आहे.
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. जर शिवसेनेच्या नेत्यांनी आव्हाडांबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असेल आणि त्याबाबत जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा होणार असेल तर त्यात काही वावगे नाही. हे तीन पक्षांचे सरकार असल्याने अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात. मात्र तिन्ही पक्ष एकसंधपणे हे राज्य चालवत आहेत, असेही जयंत पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी टाटा कर्करोग रुग्णालयाला १०० फ्लॅट देण्याच्या जितेंद्र आव्हाडांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला होता.