एकेकाळी गांधी कुटुंबाला म्हटलं होतं देशाची 'फर्स्ट फॅमिली'; आता दोष देत चाको यांनी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 16:53 IST2021-03-10T16:51:56+5:302021-03-10T16:53:28+5:30
केरळच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का

एकेकाळी गांधी कुटुंबाला म्हटलं होतं देशाची 'फर्स्ट फॅमिली'; आता दोष देत चाको यांनी दिला राजीनामा
केरळमध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय समजले जाणारे पीसी चाको यांनी राजीनामा दिला आहे. चाको यांनी बुधवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. चाको यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपला राजीनामा दिल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.
दरम्यान, केरळमध्ये पक्ष दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. तसंच याबद्दल पक्ष नेतृत्वाला दखल घेण्यास सांगून आपण थकलो असल्याचं चाको म्हणाले. "केरळमध्ये काँग्रेस पक्ष कमी होत आहे आणि पक्ष नेतृत्व त्याकडे शांतपणे पाहत आहे," असं चाको म्हणाले. चाको हे तेच नेते आहेत ज्यांनी दोन वर्षांपूर्वी गांधी कुटुंब हे देशातील पहिलं कुटुंब असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीकाही केली होती.
"मी केरळमधून येतो ज्या ठिकाणी काँग्रेससारखा कोणताही पक्ष नाही. तिकडे दोन पक्ष आहेत. काँग्रेस (I) आणि काँग्रेस (A). या दोन्ही पक्षांची एक समन्वय समिती आहे जी KPCC प्रमाणे काम करते. केरळमध्ये आता महत्त्वाच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकांना काँग्रेस हवी आहे. परंतु ज्येष्ठ नेत्यांकडून गटबाजी केली जात आहे. मी पक्ष नेतृत्वाला याची कल्पना दिली आणि हे सर्व संपवण्याची विनंती केली. परंतु पक्ष नेतृत्व दोन्ही गटांच्या प्रस्तावांना सहमती देत आहे," अंसं ते म्हणाले.
एकेकाळी गांधी कुटुंबाला म्हटलं होतं फर्स्ट फॅमिली
दोन वर्षांपूर्वी चाको यांनी गांधी कुटुंबाला देशाची फर्स्ट फॅमिली असं संबोधलं होतं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या पहिल्या कुटुंबाबद्दल नकारात्मक विचार आहेत. ते खरंच भारतातील पहिलं कुटुंब आहे. भारत त्यांचा आभारी आहे. भारत आज जो काही आहे तो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योजना आणि नेतृत्वांमुळेच आहे," असं ते म्हणाले होते.
विधानसभेच्या निवडणुका
केरळममध्ये ६ एप्रिलला एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तसंच या निवडणुकांचे निकाल २ मे रोजी घोषित केले जातील. यापूर्वी मागील आठवड्यात राहुल गांधींच्या वायनाड या क्षेत्रातील ४ नेत्यांनी राजीनामा दिला होता.