"लतादीदी, सचिन तेंडुलकर ही आमची दैवतं; त्यांच्या नव्हे, भाजप आयटी सेलच्या चौकशीचे आदेश दिलेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 04:08 PM2021-02-15T16:08:12+5:302021-02-15T16:17:57+5:30

भाजप आयटी सेल प्रमुखांसह १२ इन्फ्लुएन्सर्सची नावं प्राथमिक तपासात समोर आल्याचा गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा

Sachin Tendulkar Lata Mangeshkar were not ordered to be questioned farmers protest tweet BJP IT cell was ordered to be questioned home minister anil deshmukh | "लतादीदी, सचिन तेंडुलकर ही आमची दैवतं; त्यांच्या नव्हे, भाजप आयटी सेलच्या चौकशीचे आदेश दिलेत"

"लतादीदी, सचिन तेंडुलकर ही आमची दैवतं; त्यांच्या नव्हे, भाजप आयटी सेलच्या चौकशीचे आदेश दिलेत"

Next
ठळक मुद्देभाजप आयटी सेल प्रमुखांसह १२ इन्फ्लुएन्सर्सची नावं प्राथमिक तपासात समोर, गृहमंत्र्यांचा दावासचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नाही, गृहमंत्र्यांचं वक्तव्य

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात कुणाच्या दबावाखाली ट्वीट केलं होतं का, याची चौकशी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाकडून करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी दिलं होतं. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटला भारतीय सेलिब्रिटींनी प्रत्युत्तर दिलं होतं. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याशी झूमवर संपर्क करून ‘त्या’ ट्वीट्सची चौकशी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, या प्रकरणी बोलताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं सांगत अनिल देशमुख यांनी आपण लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या चौकशीचे आदेश दिलेच नव्हते असं म्हटलं. पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी या प्रकरणी भाष्य केलं. 

मध्यंतरी जे सेलिब्रिटींच्या ट्वीटच्या बाबतीत सुरू होतं त्यात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. ज्या सेलिब्रिटींचे शेतकरी आंदोलनादरम्यान ट्वीट आले होते त्याप्रकरणी मी भाजपच्या आयटी सेलची चौकशी करू असं म्हटलं होतं. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून लता मंगेशकर यांची चौकशी करणार, सचिन तेंडुलकर यांची चौकशी करणार अशा बातम्या आल्या होत्या. लतादीदी या आमच्या दैवत आहेत. सचिन तेंडुलकरला भारतातील प्रत्येक व्यक्ती मानते. अशा व्यक्तींची चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता," असं अनिल देशमुख म्हणाले. 

मी जो आदेश दिला होता तो भाजपचा आयटी सेल आहे त्यांची चौकशी करण्याचा होता. त्यांनी काही स्क्रिप्ट दिली का? प्राथमिकरित्या आम्ही चौकशी केली आहे. त्यात भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आणि १२ इन्फ्लुएन्सर्सची नावं समोर आली आहेत. पुढील चौकशी रितसर सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

Web Title: Sachin Tendulkar Lata Mangeshkar were not ordered to be questioned farmers protest tweet BJP IT cell was ordered to be questioned home minister anil deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.